Rahul Gandhi: यंदाच्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुरुवातीपासूनच विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांनी विविध मुद्द्यांवरुन सत्ताधारी पक्षाला जेरीस आणलं. त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांमुळं अनेकदा लोकसभा तहकूब करावं लागलं होतं. त्यानंतर कालच्या आपल्या भाषणात त्यांनी मोदी सरकारवर अनेक गंभीर आरोप करत यांनी देश विकायला काढला आहे, अशा शब्दांत सरकारवर घणाघाती टीका केली होती. यापार्श्वभूमीवर राहुल गांधींविरोधात अपात्रतेचा प्रस्ताव सत्ताधाऱी खासदारांकडून आणण्यात आला आहे. यामागची नेमकी कारणं काय आहेत? जाणून घेऊयात.
भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी गुरुवारी लोकसभेत एक विशेष प्रस्ताव मांडला. यामध्ये विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांची सदस्यता रद्द करावी तसंच भविष्यात निवडणूक लढवण्यावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. दुबे यात म्हणतात, सोरोस फाऊंडेशन आणि देशाचे तुकडे करणाऱ्यांसोबत राहुल गांधी भारताचं विभाजन करु इच्छित आहेत. त्यामुळं मी लोकसभेच्या नियम ३५२ (५) आणि ३५३ अंतर्गत राहुल गांधींची सदस्यत्व रद्द करण्याची आणि भविष्यात त्यांना निवडणूक लढवण्यापासून रोखण्याचा प्रस्ताव मांडला आहे.
या प्रस्तावावर राहुल गांधी यांनी ट्विटद्वारे प्रतिक्रिया दिली आहे. यात ते म्हणतात, सरकारनं माझ्याविरोधात एफआयआर दाखल करावी किंवा खटला भरावा किंवा विषेशाधिकारभंगाचा प्रस्ताव आणावा पण मी शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रत्येक व्यासपीठावर लढत राहणार आहे. कोणतेही व्यापारी करार मग ते शेतकऱ्यांच्या तोंडचा घास काढून घेणार असेल किंवा देशाची अन्न सुरक्षा संपवणार असेल ते पूर्णपणे शेतकरीविरोधी आहे. अन्नदात्याच्या हिताविरोधात कोणतंही पाऊल मोदी सरकारनं उचललेलं असेल त्यांना करार करायला भाग पाडलं जाऊ शकत नाही. आपला संघर्ष हा शेतकऱ्यांचे अधिकार आणि खाद्य सुरक्षेपर्यंत कायम राहतील.
दरम्यान, वरिष्ठ भाजप नेते वानाथी श्रीनिवासन यांनी गुरुवारी राहुल गांधींना आवाहन केलं की त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावरुन राजकारण करु नये. याउलट रचनात्मक राजकारणावर लक्ष द्याव. माजी लष्करप्रमुख जनरल मुकुंद नरवणे यांच्या आत्मचरित्रावरुन राहुल गांधींनी मुद्दे मांडल्याची त्यांनी कठोर शब्दांत निंदा केली. तसंच काँग्रेस नेत्यांकडून जाणीवपूर्वक देशाच्या सुरक्षेवरुन राजकारण केलं जात असल्याचं म्हटलं. राहुल गांधी ज्यांना जनतेनं नाकारलं आहे, ते लोकसभेत अराजकता निर्माण करत आहेत. राजकारणात हजारो काम करण्यासारखी आहेत, पण ते गरज नसताना देशाच्या सुरक्षेवरुन राजकारण करत आहेत. यामुळं त्यांचं विरोधीपक्ष नेतेपद देखील संकटात येऊ शकतं, असा इशाराही यावेळी श्रीनिवासन यांनी दिला.
अधिवेशनाला सुरुवात झाल्यानंतर बजेट सादर झालं आणि त्यानंतर राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना राहुल गांधी यांनी सभागृहात माजी लष्कर प्रमुख जनरल नरवणे यांच्या पुस्तकातील उल्लेख करत खळबळ उडवून दिली होती. यामध्ये भारत-चीनमधील तणावाच्या परिस्थितीचा उल्लेख होता. त्यांनतर त्यांनी भारत-अमेरिका व्यापार करारावरुन सरकारला धारेवर धरलं होतं, त्यामुळं अनेकदा सभागृहाचं कामकाज स्थगितही करावं लागलं होतं. पण यामुळं राहुल गांधी हे सत्ताधाऱ्यांना घाम फोडणारे विरोधीपक्ष नेते म्हणून चर्चेत राहिले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.