Uttar Pradesh election update : उत्तर प्रदेशातील माजी IAS अधिकारी दिव्या मित्तल यांनी राजकारणात प्रवेशाची घोषणा केली आहे. आयएएस नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी राजकारणात येणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर त्यांनी गुरूवारी आपली उमेदवारी जाहीर करत नव्या राजकीय पक्षाचीही घोषणा केली आहे.
दिव्या मित्तल यांनी उत्तर प्रदेशातील मिर्झापूर नगर या विधानसभा मतदारसंघातून आगामी निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या मतदारसंघात भाजपचे वर्चस्व आहे. भाजपचे रत्नाकर मिक्षा हे २०१७ आणि २०२२ असे सलग दोनदा या मतदारसंघातून विजयी झाले आहेत. त्यांनी समाजवादी पक्षाचे उमेदवार कैलाशनाथ चौरसिया यांचा पराभव केला होता.
चौरसिया हे २००२ पासून सलग तीन निवडणुकांमध्ये याच मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यामुळे या मतदारसंघात मातब्बर नेते आहेत असे असूनही मित्तल यांनी या मतदारसंघाची निवड केली आहे. आता त्यांना बलाढ्य भाजपचा सामना करावा लागणार आहे. विशेष म्हणजे मित्तल यांनी मिर्झापूरच्या जिल्हाधिकारी म्हणूनही पदभार सांभाळला होता. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात त्यांची आधीपासून चांगली ओळख आहे. त्यामुळे त्यांच्या उमेदवारीचा नेमका कुणाला फटका बसणार याबाबत उत्सुकता वाढली आहे.
कोणता पक्ष?
दिव्या मित्तल यांनी कोणत्याही प्रस्थापित राजकीय पक्षात प्रवेश करणार नसल्याचे सांगत स्वत:च्या पक्षाची घोषणा केली आहे. 'जन नीती भारत' हे त्यांच्या पक्षाचे नाव आहे. या पक्षाच्या माध्यमातून राज्यभर उमेदवार उतरविणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले आहे. निर्णय प्रक्रियेत जनतेला थेट सहभागी करून घेणे, हे मुख्य उद्दिष्ट असल्याचे मित्तल यांनी सांगितले.
प्रत्येक विकास प्रकल्प आणि प्रशासकीय निर्णय हा जात, धर्म किंवा अस्मितेवर नव्हे, तर जनतेच्या प्रत्यक्ष गरजांवर आधारित असेल. महिला सुरक्षा आणि स्थानिक विकास उपक्रमांमध्ये जनतेचा थेट सहभाग असेल. सरकारी योजना, अर्थसंकल्प आणि विकास प्रकल्पांविषयीची सर्व माहिती थेट जनतेच्या मोबाईल फोनवर उपलब्ध होईल, असे मित्तल यांनी सोशल मीडियात पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.