

Ankita Bhandari case : भाजप नेते दुष्यंत गौतम यांची नुकतीच सिक्कीमच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली आहे. त्यानंतर काही तासांतच एका हत्या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. २०२२ मधील अंकिता भंडारी हत्या प्रकरणाने पुन्हा डोके वर काढले आहे. अंकिताच्या आई-वडिलांनी दुष्यंत गौतम यांची नियुक्ती रद्द करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी ते बुधवारी इंडिया गेटसमोर आंदोलनाला बसले होते. पोलिसांनी गुरूवारी पहाटे त्यांना ताब्यात घेतले.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियांका गांधी यांनी बुधवारी अंकिताच्या आई-वडिलांची भेट घेत त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. पोलिसांनी इंडिया गेटवरून आपल्याला हटविले तर आंदोलन सुरू राहील. आपण घरी उपोषण करू असे स्पष्ट करत अंकिताच्या आई-वडिलांनी सरकारला २४ तासांचा अल्टिमेटम दिला आहे.
नेमकं काय प्रकरण आहे?
उत्तराखंडमधील एका रिसॉर्टमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या १९ वर्षीय अंकिताची सप्टेंबर २०२२ मध्ये हत्या झाली होती. १८ सप्टेंबरला नेहमीप्रमाणे काम संपवून ती रिसॉर्टमधून घरी जाण्यासाठी निघाली होती. पण ती घरी पोहचलीच नाही. तिचा मृतदेह चार दिवसांनी एका कालव्यात आढळून आला होता. याप्रकरणी पोलिसांनी रिसॉर्ट मालक पुरकित आर्य आणि त्याचे साथीदार सौरभ भास्कर व अंकित गुप्ता यांनी अटक केली होती.
आरोपींनी अंकिताला देहव्यापारासाठी जबरदस्ती केली होती. तिने नकार दिल्या हत्या करण्यात आला. या प्रकरणी तिघांनीही न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर डिसेंबर २०२५ मध्ये अचानक भाजप नेते दुष्यंत गौतम यांचे नाव चर्चेत आले होते. हरिद्वारमधील ज्वालापूरचे आमदार सुरेश राठोड आणि एका महिलेमध्ये झालेल्या फोन कॉलचे रेकॉर्डिंग व्हायरल झाले होते. यामध्ये संबंधित महिलेकडून एका व्हीआयपीचा उल्लेख केला जात होता.
अंकिताची हत्या व्हिआयपी गट्टूमुळे झाल्याचे कॉल रेकॉर्डिंगमधील संभाषणात बोलले जात होते. एका व्हीआयपीने अंकिताकडे एक्स्ट्रा सर्व्हिस मागितली होती. तिने नकार दिल्याने हत्या केली गेल्याचा उल्लेखही संभाषणात आला होता. त्यानंतर दुष्यंत गौतम यांचे नाव चर्चेत आले होते. हे प्रकरण तापू लागल्यानंतर दुष्यंत गौतम यांनी आपल्या त्याच्याशी संबंध नसल्याचे सांगत ५ जानेवारी २०२६ रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
दुष्यंत गौतम यांनी ७ जानेवारी २०२६ रोजी दिल्ली हायकोर्टात सुरेश राठोड, संबंधित महिलेसह काँग्रेसच्या काही नेत्यांविरोधात मानहानीचा खटलाही दाखल केला आहे. अंकिताच्या आई-वडिलांनीही त्यावेळी आरोप केले होते. त्यानंतर आता दुष्यंत गौतम यांची राज्यपालपदी नियुक्ती होताच ते आक्रमक झाले असून त्याविरोधात आवाज उठविला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.