CJI Dhananjay Chandrachud, Governor RN Ravi Sarkarnama
देश

Supreme Court News : सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या तंबीनंतर राज्यपालांची माघार; ‘त्या’ नेत्याला देणार शपथ

Governor RN Ravi News : राजभवनच्या वतीने आज दुपारी साडेतीन वाजता शपथविधी होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे या वादावर आता पडदा पडला आहे.

Rajanand More

Tamil Nadu News : महाराष्ट्रासह विविध राज्यांतील सरकारे आणि राज्यापालांमधील वाद अनेकदा टोकाला गेल्याचे पाहायला मिळाले आहे. तामिळनाडूचे राज्यपाल आर. एन. रवी आणि राज्य सरकारमध्येही अनेकदा खटके उडाले आहेत. अशाच एका वादावर सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court News) आदेशानंतर आज पडदा पडला. एका नेत्याला मंत्रिपदाची शपथ देणार नसल्याची भूमिका राज्यपालांनी घेतली होती. सरकारने कोर्टात धाव घेतल्यानंतर काल राज्यपालांना चांगलेच धारेवर धरण्यात आले. त्यानंतर आज राज्यपालांनी माघार घेतली.

राजभवनकडून आज द्रमुकचे (DMK) नेते पोनमुडी यांना मंत्रिपदाची शपथ दिली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. दुपारी साडेतीन वाजता हा शपथविधी सोहळा पार पडेल, असे राजभवनकडून सांगण्यात आले आहे. त्यांच्याकडे उच्च शिक्षण, तंत्र शिक्षण व माहिती तंत्रज्ञान विभागाचा कार्यभार सोपवण्यास राज्यपालांनी मंजुरी दिली आहे.

मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन सरकारने राज्यपालांकडे पोनमुडी यांना मंत्रिमंडळात समाविष्ट करण्याबाबत शिफारस केली होती. पण ही शिफारस राज्यपालांनी फेटाळून लावली होती. सरकारमधील तत्कालीन मंत्री पोनमुडी यांना नुकतीच एका प्रकरणात मद्रास हायकोर्टाने (Madras High Court) दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यामुळे कायद्यानुसार त्यांची आमदारकी रद्द करण्यात आली. या शिक्षेविरुद्ध पोनमुडी यांनी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) धाव घेतली. तिथे त्यांच्या शिक्षेला स्थगिती मिळाली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिक्षेला केवळ स्थगिती मिळाली आहे, असे सांगत राज्यपालांनी (Governor) सरकारच्या शिफारशीला मान्यता दिली नाही. त्याविरोधात सरकारने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. काल त्यावर सुनावणी झाली होती. या वेळी सरन्याधीश धनंजय चंद्रचूड (Dhananjay Chandrachud) यांनी राज्यपालांना चांगलेच फटकारले होते. त्यानंतर आज लगेच राज्यपालांनी शपथविधीचा निर्णय घेतला.

काय म्हणाले होते सरन्यायाधीश?

राज्यपाल सुप्रीम कोर्टाची अवहेलना करत आहेत. ज्यांनी त्यांना सल्ला दिला आहे, तो योग्य सल्ला नाही. व्यक्ती किंवा मंत्र्यांविषयी माझा दृष्टिकोन वेगळा असू शकतो, पण आम्हाला घटनात्मक कायद्याचे पालन करावे लागेल. एखाद्या व्यक्तीला नियुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री सांगत असतील तर राज्यपालांना संसदीय लोकशाहीचा भाग म्हणून ते करावे लागेल. ते राज्याचे एक औपचारिक प्रमुख आहेत, असे सरन्यायाधीश म्हणाले होते.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT