Maharashtra Political News : भाजपचे नेते विरोधी पक्षांतील नेत्यांना कधी अटक होणार, कोणावर कधी ईडी, सीबीआयची धाड पडणार याच्या तारखा, मुहूर्त जाहीर करत असतात. बहुतांश प्रकरणांत भाजप नेत्यांच्या या तारखा खऱ्या ठरल्या आहेत. याला अपवाद ठरले आहेत ते भाजप किंवा शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलेले नेते. कथित मद्यधोरण अंलबजावणी घोटाळ्यात दिल्लीचे मुख्यमंत्री अऱविंद केजरीवाल यांना अटक झाली आहे. त्यानंतर आता नाव न घेता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray News) यांनाही लवकरच अटक होणार, असे संकेत भाजपचे आमदार नितेश राणे यांनी दिले आहेत. अशा नेत्यांची मागील काही खरी ठरलेली भाकिते पाहता आता उद्धव ठाकरे यांनाही अटक होणार का, असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.
भाजपकडून (BJP) तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे का, याचे उत्तर आता ग्रामीण भागातील सामान्य नागरिकांकडूनही मिळू लागले आहे. पानटपऱ्या, चहाचे हॉटेल, चावडीवरही याबाबत गप्पा रंगू लागल्या आहेत. भाजपचे काही बोलघेवडे नेते अशा चर्चांना आणि त्यातून निघणाऱ्या निष्कर्षांना बळ देत आहेत. त्यामुळे तपासयंत्रणांचा गैरवापर सुरू असल्याचा संदेश ग्रामीण भागातही पोहोचला आहे. काँग्रेसकडून (Congress) दोनवेळा मुख्यमंत्री बनलेले अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्याच्या काही दिवस अगोदर सत्तधाऱ्यांनी संसदेत काँग्रेसच्या काळातील अर्थव्यवस्थेची, घोटाळ्यांची श्वेतपत्रिका काढली होती. त्यात अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना झालेल्या आदर्श घोटाळ्याचा उल्लेख होता, हे विशेष म्हणावे लागेल; कारण अगदी शेवटच्या दिवसांपर्यंत काँग्रेससाठी काम करणारे, भाजप प्रवेशाच्या अफवा नाकारणारे अशोक चव्हाण अचानक भाजपमध्ये दाखल झाले होते.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांना अटक झाल्यानंतर आमदार राणे यांनी ट्विटरवर सूचक इशारा दिला आहे. यासाठी त्यांनी वापरलेली भाषा त्यांचा आणि त्यांच्या पक्षाचा अहंकार दाखवणारी आहे. ते ट्विट असे आहे - आज... मफलरवाला अंदर गया... जल्दी ही.. गले के पट्टेवाला भी अंदर जाएगा.. क्रोनोलॉजी समझे भाईयों... क्रोनोलॉजी म्हणजे घटनाक्रम समजून घ्या, असे राणे (Nitesh Rane) म्हणत आहेत. याचा अर्थ काय घ्यायचा? याचा अर्थ असा तर नव्हे की लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Election 2024) प्रचार सुरू होईपर्यंत विरोधी आघाडीतील महत्वाचे नेते कारागृहात असतील? प्रथमदर्शनी तर राणे यांच्या ट्विटचा अर्थ असाच दिसून येत आहे. उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आणि मुलाने काही दिवसांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची लपूनछपून दिल्लीत भेट घेतल्याचा आरोप भाजप नेत्यांकडून करण्यात आला होता.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
भाजप नेते किरीट सोमय्या हेही सातत्याने विविध नेत्यांच्या अटकेचे, त्यांच्यावर पडणाऱ्या धाडींचे अपडेट्स सोशल मीडियावर देत असतात. त्यानुसार काही जणांना अटक झाली, काही धाडीही पडल्या आहेत. त्यांनी जाहीर केलेल्या कथित घोटाळ्यांत सामील काही नेते आता भाजप, शिंदे गटात गेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका जाहीर सभेत महाराष्ट्रातील 70 हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्याचा उल्लेख केला आणि त्याच्या काही दिवसांनंतर अजितदादा पवार हे आमदरांसह भाजपसोबत सत्तेत सहभागी झाले. आदर्श, सिंचन घोटाळ्याचे काय होणार, चौकशी होऊन दोषी तुरुंगात जाणार का, याचे उत्तर सोमय्या, राणे यांच्याकडून मिळेल याची सूतराम शक्यता नाही. भाजप, शिंदे गटात गेलेल्या अनेक नेत्यांच्या चौकशांचे पुढे काय झाले, याचेही उत्तर भाजपकडून मिळणार नाही.
उद्धव ठाकरे यांना कोणत्या प्रकरणात अटक होणार, याचा उल्लेख आमदार राणे यांनी केलेला नाही, मात्र उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा सुरू आहे. अमुक नेत्याला लवकरच अटक होणार, अशी माहिती या भाजप नेत्यांना संबंधित तपास यंत्रणांकडून दिली जात असेल का, अशीही शंका निर्माण झाली आहे. ती आता ग्रामीण भागापर्यंत रुजली आहे. निवडणुकीत याचा आपल्याला फायदा होईल, असे भाजपला वाटत असेल. तसे वाटले नसते तर भाजपने अशा वाचाळ नेत्यांना नक्कीच आवर घातला असता. असे प्रकार राजकीय क्षेत्रापुरतेच मर्यादित राहिलेले नाहीत. सामाजिक सलोखाही दूषित करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जात आहे. निवडणुका जिंकण्यासाठी सामाजिक सलोखा, शांतता पणाला लावली जात आहे. सरकार हे सर्व प्रकार उघड्या डोळ्यांनी पाहात आहे.
गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये कराड येथील एका घरात गॅस सिलिंडरचा स्फोट झाला होता. त्यात पती-पत्नीचा मृत्यू झाला होता. बॉम्बची चाचणी करताना तो स्फोट झाला, असा आरोप नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन केला आणि एका विशिष्ट समुदायाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. लोकप्रतिनिधींच्या दबावामुळे तो प्रकार दाबण्यात आला, हिवाळी अधिवेशनात त्या लोकप्रतिनिधींची नावे जाहीर करणार असल्याचे आमदार राणे यांनी म्हटले होते. या प्रकरणाची चौकशी दहशतवादीविरोधी पथकामार्फत करावी, अशी मागणीही त्यांनी केली होती. त्या स्फोटाबाबत फोरेन्सिक लॅबचा अहवाल आला.
गळतीमुळे गॅस सिलींडरचा स्फोट झाला होता, असे सिद्ध झाले. इतके सगळे होऊनही भाजप नेतृत्वाने नितेश राणे यांना साधी समजही दिली नाही, विरोधकांनीही तशी मागणी केली नाही. विरोधकांना संपवण्याचा हा उन्माद भाजपला कदाचित निवडणुकीत यश मिळवून देऊही शकेल, मात्र त्यामुळे राजकीय, सामाजिक वीण कायमची उसवणार आहे, याचीही जाणीव भाजप आणि महायुतीसह महाविकास आघाडीनेही ठेवायला हवी.
(Edited By - Rajanand More)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.