देश

Dr. Babasaheb Ambedkar: वडिलांच्या पुण्यतिथीच्या दिवशी आंबेडकरांनी केलं होतं धर्मांतर; असा झाला ऐतिहासिक सोहळा; पण..

Dr. Babasaheb Ambedkar Converted to Buddhism Historic Ceremony:बाबासाहेब आंबेडकर आपल्या पत्नी सविताबाई आणि सहाध्यायी राहू व इतरांसह दीक्षाभूमीवर पोहोचले, तेव्हा त्यांनी नवीन पांढरं रेशमी धोतर, पांढरा सदरा आणि वर पांढरा शुद्र लांब कोट असा पेहराव केला होता..

Mangesh Mahale

Dr. Babasaheb Ambedkar News: डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती, नागपुरात हा सोहळा कसा झाला होता? या ऐतिहासिक घटनेला कोण कोण उपस्थित होते, हे जाणून घेऊया! 14 ऑक्टोबर 1956 याच दिवशी आंबेडकरांच्या वडिलांची पुण्यतिथी होती.

बौद्ध धर्मस्वीकाराच्या सोहळ्यासाठी नागपूरच्या दीक्षाभूमीवर साचीच्या स्तूपाचा आकार देऊन शुभ्र वस्त्रांकित व्यासपीठ तयार केलं होतं. या व्यासपीठाच्या समोर दोन भव्य मंडप उभारलेले होते. बौद्ध धर्माचा संदेश प्रचारीत करण्यासाठी निळ्या, तांबड्या, हिरव्या पताका व ध्वज सर्वत्र लावलेले होते.

नवायानाचा अर्थात बौद्ध धर्माचा स्वीकार करण्यासाठी १४ ऑक्टोबरच्या सकाळी सुमारे ९ वाजता बाबासाहेब आंबेडकर आपल्या पत्नी सविताबाई आणि सहाध्यायी राहू व इतरांसह दीक्षाभूमीवर पोहोचले, तेव्हा त्यांनी नवीन पांढरं रेशमी धोतर, पांढरा सदरा आणि वर पांढरा शुद्र लांब कोट असा पेहराव केला होता, सविताबाईनीही पांढरं लुगडं परिधान केलं होतं.

सुमारे तीन लाखांच्या जनसागराने त्यांचं उत्साहाने स्वागत केलं. अनेकांनी उत्साहाने त्यांना व्यासपीठावर नेलं. एका हातात सोटा घेऊन व दुसरा हात सहाध्यायी रडुच्या खांद्यावर ठेवून ते मंचावर दर्शनासाठी उभे राहिले, तेव्हा लाखो अनुयायांनी टाळ्यांचा कडकडाट केला. व्यासपीठावरील एका टेबलावर लहानशी कास्याची बुद्धमूर्ती ठेवलेली होती.

व्यासपीठावर 'महाबोधी'चे कार्यवाह देवप्रिय वालीसिंह सारनाथचे थेरो भिक्खू सद्धातीसा, भिक्षु परमशांती, सामथचे संघरत्ना, साचीचे पन्नातिसा, हुबळीचे परमशांती भिक्खू पण्णानंदा हे बौद्ध धर्मोपदेशक बसले होते.

त्या दिवशी डॉ. आंबेडकरांच्या वडिलांची पुण्यतिथी असल्याने त्यांच्या स्मरणार्थ दोन मिनिटं स्तब्धता पाळली गेली, आंबेडकर शपथ घेण्यासाठी बुद्धमूर्तीसमोर नतमस्तक झाले. महास्थवीर चंद्रमणी व इतर ४ भिक्खूंनी पाली भाषेत आंबेडकर व त्यांच्या पत्नी सविताबाई यांच्याकडून 'बुद्धं सरणं गच्छामि, धम्मं सरणं गच्छमि, संघं सरणं गच्छामि' हे शरणत्तयं व इतर पंचशीले म्हणवून घेतली.

त्यानंतर पाली भाषेतील मंत्र आंबेडकरांनी मराठीत म्हटले, त्यांनी बुद्धमूर्तीला पुष्पहार घातल्यावर त्यांचं बौद्ध धर्मात आगमन झाल्याचं घोषित झालं आणि 'भगवान बुद्ध की जय', 'बाबासाहेब आंबेडकर की जय' या लाखोंच्या जनसागराने केलेल्या घोषणांनी आसमंत दुमदु‌मून निघाला.

संसदीय पक्षांच्या ज्येष्ठ नेत्यांनी फिरवली होती पाठ

बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतर सोहळ्याला माजी न्यायाधीश एम. भवानीशंकर नियोगी आणि डॉ. आंबेडकरांचे महाराष्ट्रातील काही सहकारी उपस्थित होते. त्याचप्रमाणे ब्रह्मदेशचे (आजचे म्यानमार) यू. बा. स्वे, 'सिलोन'चे (श्रीलंकेचे) एच.डब्ल्यू. अमरसूरिया, कोलकात्याचे अरविंद बारुआ आदीनी आंबेडकरांना स्वागतपर संदेश पाठवले होते, पण भारतातील संसदीय पक्षांच्या बहुतांश ज्येष्ठ नेत्यांनी या सोहळ्याकडे पाठ फिरवली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT