Ukraine  Sarkarnama
देश

युद्धाची दाहकता! एकाच आठवड्यात युक्रेनमधून तब्बल 10 लाख नागरिकांचे पलायन

रशियाने युक्रेनवर आक्रमण केले असून, या युद्धाचे चटके आता इतर देशांनीही बसू लागले आहेत.

सरकारनामा ब्युरो

किव्ह : रशियाने (Russia) युक्रेनवर आक्रमण केले असून, या युद्धाचे चटके आता इतर देशांनीही बसू लागले आहेत. भारतातील अनेक विद्यार्थी युक्रेनमध्ये (Ukraine) अडकले आहेत. त्यांना तेथून बाहेर काढण्याचा प्रयत्न मोदी सरकारकडून युद्ध पातळीवर सुरू आहे. दरम्यान, युद्धाच्या भीतीने एकाच आठवड्यात युक्रेनमधील सुमारे दहा लाख नागरिकांनी स्थलांतर केले आहे. या स्थलांतरितांचा लोंढा शेजारील देशांमध्ये धडकत आहे. (Russia-Ukraine War Updates)

युक्रेनमधील स्थलांतर हे अत्यंत मोठ्या संख्येने झालेले या शतकातील हे सर्वांत वेगवान स्थलांतर असल्याचे संयुक्त राष्ट्रांनी (United Nations) म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या स्थलांतर विभागाने याबाबत आकडेवारी जाहीर केली. युक्रेनवर रशियाने तीन बाजूंनी केलेल्या आक्रमणामुळे अनेक नागरिक जीवाच्या आकांताने देश सोडून पलायन करीत आहेत. युरोपमधील शेजारी देश असलेल्या पोलंडसह रोमानिया आणि इतर देशांमध्ये हे युक्रेनचे नागरिक आश्रय घेत आहेत.

गेल्या आठवड्यात झालेल्या रशियाच्या आक्रमणानंतर युक्रेनच्या एकूण लोकसंख्येपैकी दोन टक्के नागरिकांनी देशाबाहेर आश्रय घेतला आहे, असे संयुक्त राष्ट्रांनी सांगितले आहे. युक्रेनमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असलेल्या खारकिव्हवर रशियाने हल्ले सुरु ठेवले आहेत. यामुळे या शहरातून बाहेर पडणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. हजारो नागरिक मिळेल त्या वाहनाने शहर सोडत आहेत. किव्ह शहरात रोजच रशियाकडून बाँबहल्ले सुरू आहेत. याचबरोबर क्षेपणास्त्र हल्लेही होत आहेत.

रशियाच्या सैन्याचे हाल

युक्रेनवरील हल्ल्यानंतर जगाने रशियाला एकटे पाडल्याचे चित्र आहे. यामुळे रशियाची अर्थव्यवस्था अत्यंत अडचणीत आल्याचे दिसत आहे. रशियाची बाहेरील देशांमधील संपत्तीही गोठविण्यात आली आहे. तसेच, रशियाचे आंतरराष्ट्रीय व्यवहारही बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडे युद्ध सुरु ठेवण्यासाठी पैसेच नसल्याचा दावा अर्थतज्ज्ञ करीत आहेत. याचाच परिणाम युद्धावर होऊ लागला आहे. युक्रेनमध्ये लढणाऱ्या सैन्याला अन्नाची आणि इंधनाची कमतरता भासत आहे. त्यामुळे किव्ह शहराचा पाडाव करण्यासाठी निघालेले रशियाचे शेकडो रणगाडे इंधनाविना शहराच्या वेशीवरच थांबून राहिले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT