Kolkata News: पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत 15 वर्षांची सत्ता गमवावी लागलेल्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना धक्क्यावर धक्के बसले जात आहेत. एकीकडे तृणमूलचे आमदार-खासदार यांनी बंड केल्यानंतर दुसरीकडे बॅनर्जी यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे.
सक्तवसुली संचलनालया (ईडी)नं आता पश्चिम बंगालमध्ये कारवाईचा धडाका लावला आहे. यात ईडीच्या निशाण्यावर ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस पक्ष आणि नेते असल्याचं दिसून येत आहे. खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्या निवासस्थानी छापेमारी केल्यानंतर आता ईडीनं टीएमसीशी संबंधित तीन खाती गोठवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
ईडीनं तृणमूल काँग्रेस पक्षाशी संबंधित ही कारवाई मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत केल्याची धक्कादायक बाब समोर येत आहे. या टीएमसीच्या गोठवलेल्या खात्यात एकूण 440 कोटी जमा असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ईडीनं पश्चिम बंगालची राजधानी असलेल्या कोलकातामध्ये अनेक ठिकाणी छापेमारी केली. या कारवाईमागं ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाच्या विविध खात्यांद्वारे होत असलेल्या कथित संशयास्पद आर्थिक व्यवहार आणि एम्ब्रेअर विमानांसह ऑगस्टा वेस्ट लँड हेलिकॉप्टर खरेदी खर्चाच्या चौकशीची पार्श्वभूमी असल्याचं बोललं जात आहे. या व्यवहारावेळी टीएमसीच्या बँक खात्यांमध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचा संशय ईडीला आहे.
विशेष म्हणजे तृणमूल काँग्रेस पक्षाच्या बंडखोर आमदारांनीच त्यांच्या पक्षाच्या निधी म्हणून जमा झालेल्या पैशांच्या स्रोताची चौकशीची मागणी लावून धरली होती. या मागणीनंतरच कोलकाता पोलिसांनी टीएमसीच्या तीन बँक खात्यांमधील आर्थिक व्यवहार आणि पैसे काढण्यावर बंदी घातली होती.
पश्चिम बंगाल पोलिसांनी ही चौकशी दाखल एका एफआयआरच्या आधारे सुरू केली आहे. जयनगर विधानसभा मतदारसंघाचे तृणमूलचे आमदार बिस्वनाथ दास यांनी ही तक्रार दाखल केली होती. दास यांनी नंतर विरोधी पक्षनेते ऋतब्रत बॅनर्जी यांच्या गटात प्रवेश केला आहे.
मात्र,पश्चिम बंगालमधील कोलकाता पोलिसांनी याप्रकरणी फिर्याद दाखल झाल्यानंतर काही तासांतच बिधाननगर पोलिस आयुक्तालयाने TMC ची बँक खाती गोठवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी हा निर्णय रद्द करण्यासाठी कलकत्ता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
ईडीनं तृणमूल काँग्रेस विरोधातील कथित मनी लॉन्डरिंग प्रकरणाच्या चौकशीत मोठा दावा केला आहे. यात टीएमसी पक्षाकडून गेल्या तीन वर्षांत 100 कोटी रुपयांहून अधिक रक्कम विमान भाडेतत्त्वावर देणाऱ्या आणि व्यवस्थापन करणाऱ्या केअरवेल एव्हिएशन इंडिया या कंपनीला हस्तांतरित करण्यात आल्याचे तपासात समोर आल्याची माहिती द प्रिंट या इंग्रजी वृत्तपत्रानं दिली आहे.
ED सूत्रांच्या माहितीनुसार, TMC कडून हस्तांतरित करण्यात आलेल्या निधीतून केअरवेल एव्हिएशन इंडियाने सुमारे 112 कोटी रुपये खर्च करून एक Embraer Legacy 600 विमान आणि एक Agusta 109 SP हेलिकॉप्टर खरेदी केले. त्यानंतर ही दोन्ही विमाने पुन्हा तृणमूल काँग्रेसलाच भाडेतत्त्वावर देण्यात आली आणि त्यासाठी पक्षाकडून भाड्याच्या नावाखाली मोठी रक्कम देण्यात आली.
EDने केअरवेल समूहाशी संबंधित पाच ठिकाणी छापे आणि त्याचवेळी तृणमूल काँग्रेसच्या बँक खात्यांची तपासणी अशाप्रकारे एखाद्या राजकीय पक्षाविरोधात केलेली पहिलीच चौकशी असल्याचं बोललं जात आहे.
ईडीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल 2023 ते जून 2026 या कालावधीत तृणमूल काँग्रेसच्या खात्यांमधून केअरवेल एव्हिएशन इंडिया आणि तिच्याशी संबंधित अन्य एका कंपनीकडे सुमारे 160 कोटी रुपये हस्तांतरित करण्यात आले. यापैकी 82.96 कोटी रुपये पुढे नव्याने स्थापन करण्यात आलेल्या संबंधित कंपनीकडे वळवण्यात आल्याचे तपासात आढळले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.