Karnataka ED Raid News : काँग्रेस नेते तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी परदेशात बेकायदा गुंतवणूक केल्याच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर ईडीने त्यांच्या निवासस्थानासह संबंधित ठिकाणी छापे टाकले होते. यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून जारकीहोळी यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते तथा भाजप नेते आर. अशोक यांनी केली.
एकीकडे त्यांनी अंमलबजावणी संचालनालयाचा (ईडी) तपास पूर्ण होऊन जारकीहोळी निर्दोष असल्याचे सिद्ध होईपर्यंत त्यांनी मंत्रिपदावर राहणे योग्य नाही, असेही म्हटले आहे. तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे बेळगावी लोकसभा मतदारसंघाचे खासदार जगदीश शेट्टर जारकीहोळी यांची भेट घेत बंद दरवाजाआड चर्चा केली आहे. यानंतर राजकीय वर्तुळात आता तर्कवितर्कांना उधाण आले असून या भेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी व त्यांच्या निकटवर्तीयांवरील ‘ईडी’चे (सक्तवसुली संचालनालय) छापे चर्चेत असतानाच राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील (पीडब्ल्यूडी) कंत्राटांतून मिळविलेला पैसा परदेशातील खाण व्यवसायात गुंतवून मालमत्तेत रूपांतरित केल्याचा आरोप होत आहे. यानंतर भाजपने त्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते तथा भाजप नेते आर. अशोक यांनी तशी मागणी केल्याने काँग्रेसच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
अशातच भाजपचे नेते, माजी मुख्यमंत्री तथा बेळगावचे विद्यमान खासदार जगदीश शेट्टर यांनी गोकाक येथे जारकीहोळी बंधूंची भेट शनिवारी घेतली. तसेच त्यांनी माजी मंत्री व गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी, विधान परिषद सदस्य लखन जारकीहोळी, जिल्हा बँक संचालक अमरनाथ जारकीहोळी यांच्याशी बंद दरवाजा आड सुमारे एक तास चर्चा केली. या भेटीमुळे आता राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
दरम्यान सतीश जारकीहोळी यांच्या निकटवर्तीयांवर आणि त्यांच्या मालकीच्या संस्थांशी संबंधित ठिकाणी ईडीने छापा टाकून चौकशी केल्याच्या पार्श्वभूमीवर शेट्टर यांची जारकीहोळी बंधूंशी झालेली भेट विशेष महत्त्वाची मानली जात आहे. विरोधी पक्षातील भाजपचे वरिष्ठ नेते असलेले खासदार शेट्टर आणि बेळगाव जिल्ह्याच्या राजकारणातील प्रभावशाली जारकीहोळी कुटुंबीय यांच्यातील ही भेट नेमक्या कोणत्या कारणासाठी झाली, याबाबतची स्पष्ट माहिती अद्याप समोर आलेली नाही.
लखन जारकीहोळी यांच्या निवासस्थानी शेट्टर पोहोचल्यानंतर रमेश आणि लखन जारकीहोळी यांच्याशी त्यांची प्रदीर्घ चर्चा झाली, पण त्यांच्यातील प्रदीर्घ चर्चेमुळे या भेटीला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. ईडीच्या कारवाईनंतर ही भेट झाल्याने तपासाशी संबंधित विषयांवर चर्चा झाली का, याबाबतही तर्कवितर्क सुरू आहेत.
तथापि, भेटीचा आणि ईडीच्या कारवाईचा थेट संबंध असल्याचे कोणतेही अधिकृत वक्तव्य अद्याप समोर आलेले नाही. जारकीहोळी बंधूंचे जिल्ह्याच्या राजकारणात मोठे वजन आहे. सतीश जारकीहोळी हे काँग्रेसमधील महत्त्वाचे नेते असून, रमेश जारकीहोळी हे २०१९ पासून भाजपमध्ये सक्रिय आहेत. लखन जारकीहोळी हे विधान परिषदेचे सदस्य आहेत.
अधिकृत माहिती दिली नाही
विशेषतः काँग्रेसमधील अंतर्गत राजकारण, भाजपची आगामी रणनीती आणि जारकीहोळी बंधूंच्या राजकीय भूमिकेच्या पार्श्वभूमीवर शेट्टर यांच्या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे. या भेटीबाबत शेट्टर किंवा जारकीहोळी बंधूंकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.