

Karnataka Congress Minister ED Raid News : कर्नाटक काँग्रेस सरकारमधील सार्वजनिक बांधकाममंत्री सतीश जारकीहोळी आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संबंधित मालमत्तांवर केलेल्या झाडाझडतीत परदेशातील विविध कंपन्यांमधील भागीदारीची कागदपत्रे, बेहिशेबी रोकड आणि परकीय चलन आढळल्याचा दावा सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) करत १८ ठिकाणी बुधवारी आणि गुरुवारी छापे टाकून झाडाझडती घेतली.
या कारवाईत ३.४५ कोटींची रोकड जप्त केल्याची माहिती ईडीने शुक्रवारी दिली. यानंतर जारकीहोळी यांनी ईडीची कारवाई राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप केला. तसेच आमच्या संस्थांची वार्षिक उलाढाल दोन हजार कोटींपेक्षा अधिक आहे. त्यामुळे ईडीच्या (सक्तवसुली संचालनालय) तपासादरम्यान सापडलेले दोन कोटी आमच्यासाठी मोठी रक्कम नाही, असेही त्यांनी म्हटलं आहे.
कर्नाटक काँग्रेस सरकारमधील सतीश जारकीहोळी आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संबंधित मालमत्तांवर ईडीने छापेमारी केली. गोकाक येथील जारकीहोळी यांचे निवासस्थान, बंगळूरमधील डॉलर्स कॉलनी आणि क्रेसेंट रोडवरील कार्यालयसह निवासस्थान, त्यांची कन्या चिक्कोडीच्या खासदार प्रियांका जारकीहोळी, मुलगा राहुल जारकीहोळी तसेच अबकारी विभागाचे अधिकारी व नातेवाईक वाय. डी. मंजुनाथ यांच्या मालमत्तांवर ईडीने छापे टाकले.
ईडीने केलेल्या झाडाझडतीत परदेशातील विविध कंपन्यांमधील भागीदारीची कागदपत्रे, बेहिशेबी रोकड आणि परकीय चलन आढळल्याचा दावा ईडीने केला आहे. काँगोतील एका खाण कंपनीत जारकीहोळी यांचा सुमारे ४० टक्के हिस्सा आहे. मुलगा, मुलगी आणि जारकीहोळी यांच्या भगिनी महादेवी मंजुनाथ यांनी काँगोतील ‘एल्डोराडो मायनिंग रिसोर्सेस’ आणि झांबियातील ‘नव औरम मायनिंग लिमिटेड’ यांसारख्या परदेशी कंपन्यांमध्ये समभाग मिळवल्याचे तपासात आढळल्याचा दावा ईडीने केला. तसेच पीडब्ल्यूडीची कंत्राटे मिळविण्यासाठी कथित लाच दिल्याचे तपासात समोर आल्याचेही ईडीने म्हटले आहे.
दरम्यान परकीय चलन व्यवस्थापन कायद्याचे (फेमा) उल्लंघन करून परदेशात बेकायदा गुंतवणूक केल्याच्या आरोपावरून ईडीने जारकीहोळी, त्यांच्या कुटुंबीयांसह निकटवर्तीयांशी संबंधित १८ ठिकाणी बुधवारी आणि गुरुवारी ईडीने छापे टाकून झाडाझडती घेतली. या कारवाईत विविध ठिकाणांहून ३.३० कोटींची बेहिशेबी रोकड तसेच अमेरिकन डॉलर आणि युरोसह सुमारे १५ लाख रुपये इतक्या मूल्यांचे परकीय चलन जप्त केल्याचे ईडीने स्पष्ट केले होते.
यावर कारवाईबाबत जारकीहोळी म्हणाले की, तपासादरम्यान घरातून सापडलेली दोन कोटींची रोकड आमचीच आहे. ती रक्कम परत मिळविण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. आफ्रिकेत खाणकाम आणि व्यापाराशी संबंधित कंपनी सुरू करण्याची आमची योजना आहे. मात्र, त्यासाठी अद्याप कोणतीही गुंतवणूक केलेली नाही. पण गुंतवणुकीची प्रक्रिया सुरू असून मुलगा आणि मुलीच्या नावाने कंपनी स्थापन केल्याचे त्यांनी मान्य केले. या संदर्भातील सर्व कागदपत्रे प्राप्तिकर विभागाला यापूर्वीच देण्यात आली आहेत. ईडीने मागणी केल्यास आवश्यक कागदपत्रेही सादर करू, असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान आता ईडीची कारवाई सुरू असून विविध ठिकाणी झाडाझडती घेण्यात आली आहे. ही झडती पूर्ण झाल्यानंतर जारकीहोळी म्हणाले की, ही ईडीची कारवाई नसून, तपासणी होती. काही शंका असल्यास थेट नोटीस देऊन माहिती मागविता आली असती. अधिकाऱ्यांनी मागितलेल्या सर्व माहितीला आम्ही उत्तर दिले असून, चौकशी व तपासात पूर्ण सहकार्य केले आहे. परदेशातील प्रस्तावित गुंतवणुकीबाबतही अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली आहे. ईडीच्या नोटिसीत परकीय चलन व्यवस्थापन कायद्याचा (फेमा) उल्लेख आहे. मात्र, परदेशातील गुंतवणुकीची प्रक्रिया अद्याप कायदेशीर टप्प्यात असल्याचे त्यांनी सांगितले.
एकीकडे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्याचा राजीनामा पडल्याने काँग्रेस अडचणीत आल्याची चर्चा आहे. अशातच जारकीहोळी यांच्यावर देखील ईडीची वक्र दृष्टी पडली आहे. यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. दरम्यान शिवकुमार यांनी ईडीच्या कारवाईनंतर प्रतिक्रिया दिली आहे.
त्यांनी, मंत्री जारकीहोळी हे माझे सहकारी असून त्यांनी कोणतेही चुकीचे काम केलेले नाही. त्यांनी कायदेशीर चौकटीतच व्यवहार केले आहेत, असे स्पष्ट केले आहे. तसेच कायदेशीर चौकटीत व्यवसाय करणे चुकीचे नाही. बाहेर जाऊ नये किंवा व्यवसाय करू नये, असे कुठे लिहिले आहे? हे सर्व राजकारण आहे.
आगामी काळात आणखी तीन-चार जणांवर छापे पडण्याची शक्यता आहे. संपूर्ण काँग्रेसला लक्ष्य करण्याची तयारी सुरू आहे. भाजप नेत्यांवर मात्र अशा प्रकारच्या कारवाया होत नाहीत. केवळ एखाद्या समाजाला नव्हे, तर संपूर्ण काँग्रेसलाच लक्ष्य केले जात असल्याचा आरोप देखील शिवकुमार यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.