Eknath Shinde Shrikant shinde Omraje Nimbalkar .jpg Sarkarnama
देश

Shivsena News: एकनाथ शिंदे दिल्लीत, शिवसेनेत धक्कादायक घडामोडी; श्रीकांत शिंदेंकडून थेट ठाकरेंच्या 'लाडक्या' खासदारासाठी मदतीचा हात पुढे

Uddhav Thackeray And Eknath Shinde Shivsena: एकनाथ शिदेंच्या बंडानंतर शिवसेनेत मोठी फूट पडल्यानंतर दोन्ही शिवसेनेतून विस्तवही जात नाही. पण आता दानवेंच्या थेट जुळवून घेण्याची गुगली, गोगावलेंची साद यानंतर आता दिल्लीतही शिंदेंच्या शिवसेनेनंही ठाकरेंच्या खासदारासाठी पुढाकार घेत मध्यस्थी केल्याचं दिसून आलं.

Deepak Kulkarni

New Delhi News: विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते व उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे आक्रमक नेते अंबादास दानवेंनी आम्हांला भाजप आणि शिंदेंसेना दूरचे नाहीत,असं वक्तव्य करुन जणू नव्या राजकीय समीकरणांचे संकेतच दिले होते. यानंतर रायगडचे आमदार भरत गोगावलेंनीही थेट उद्धव ठाकरेंनाच साद घातल्याचं समोर आलं आहे. खरंतर, एकनाथ शिदेंच्या बंडानंतर शिवसेनेत मोठी फूट पडल्यानंतर दोन्ही शिवसेनेतून विस्तवही जात नाही. पण आता दानवेंच्या थेट जुळवून घेण्याची गुगली, गोगावलेंची साद यानंतर आता दिल्लीतही शिंदेंच्या शिवसेनेनंही ठाकरेंच्या खासदारासाठी पुढाकार घेत मध्यस्थी केल्याचं दिसून आलं.

संसदेच्या अधिवेशनादरम्यान, रेल्वे मंत्रालयासंबंधीच्या अनुदान मागण्यांवर लोकसभेत सुरू असलेल्या चर्चेवेळी महाराष्ट्रातील अनेक खासदारांनी मराठीतील आपली भाषणं गाजवली. यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यात आणि कल्याण डोंबिवली मतदारसंघाचे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यात घडलेल्या एका प्रसंगानं उपस्थितांना आश्चर्याचा मोठा धक्का बसला.

खासदार ओमराजे निंबाळकर हे रेल्वे मंत्रालयसंबंधीच्या अनुदान मागण्यांसंबंधीच्या चर्चेदरम्यान भाषण करत होते. पण त्यांची वेळ संपल्याने पीठासीन अधिकारी जगदंबिका पाल यांनी लगेच पुढच्या वक्त्यांचं नाव पुकारलं. यानंतर ओमराजे निंबाळकर हे पीठासीन अधिकाऱ्यांकडे एक मिनिटांचा वाढीव अवधी मिळावा यासाठी विनंती करत होते.

मात्र, धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांच्या विनंतीला पुढील वक्ते खासदार व एकनाथ शिंदेचे सुपुत्र श्रीकांत शिंदेंनीच प्रतिसाद दिला. त्यांनी पीठासीन अधिकारी जगदंबिका पाल यांना पुढील ओमराजेंना एक मिनिट बोलू द्या, असं सांगितलं. यावेळी पीठासीन अधिकारी पाल यांनी श्रीकांत शिंदेंनी पुढाकार घेत केलेल्या मध्यस्थीवर मिश्किल टिप्पणी केली. त्यांनी श्रीकांत शिंदे यांना, ओमराजे हे जेवढा जास्त वेळ बोलतील, ती मिनिटं तुमच्या वेळेतून वजा करू, असं म्हणताच सभागृहात हशा पिकला.

या दरम्यान, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील हा अचानक घडलेल्या समन्वयाच्या प्रसंग राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर असतानाच हा प्रसंग घडला. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रिकरणाच्या चर्चांनंतर आता दोन्ही शिवसेना एकत्र येण्याच्या चर्चांना हवा दिली जात आहे.

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पुणे-सिकंदराबाद बुलेट रेल्वेमार्ग धाराशिव, लातूरमार्गे न्यावा, अशी मागणी संसदेत उचलून धरली.तर दुसरीकडे शिदेंच्या शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी मुंबईतील रेल्वेच्या जमिनींवरील अतिक्रमणधारकांना पंतप्रधान आवास योजनेशी जोडून पर्यायी घरे उपलब्ध करुन द्यावीत,याबाबत मागणी केली. विशेष म्हणजे या मागणीला उद्धव ठाकरेंच्या पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनीही जाहीर पाठिंबा दर्शविला व त्या संदर्भात राज्य सरकारचे आभारही व्यक्त केले.

गोगावलेंची ठाकरेंना साद...

भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या मुलाच्या लग्नाच्या रिसेप्शन सोहळ्यात शिवसेना आमदार भरत गोगावले नवदाम्पत्यास शुभेच्छा देत असतानाच त्याचवेळी उद्धव ठाकरेंची व्यासपीठावर एन्ट्री झाली. यावेळी गोगावले यांनी उद्धव ठाकरेंना पुढे येण्याची विनंती केली. त्यांनी, 'साहेब, इकडे या...!' अशी हाक दिली. मात्र, ठाकरेंनी नको इथंच बराय असे म्हणत स्टेजवरील गर्दी कमी होण्याची वाट पाहिली आणि नवदाम्पत्यास शुभेच्छा दिल्या.

दानवेंचा बॉम्ब...

राजकारणातील सगळी तत्व आम्हीच पाळायची का? इतर राजकीय पक्ष कसेही वागतात? सत्तेसाठीच्या तडजोडी करतात, मग आपणही सत्तेसोबत गेलं पाहिजे, अशी भावना जर आमच्या सदस्यांची असेल तर त्यात काही गैर नाही. आमच्या निवडून आलेल्या सदस्यांची इच्छा ही सत्तेत जाण्याची आहे, असे विधान करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी खळबळ उडवून दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT