Priyanka Gandhi, Lok Sabha Sarkarnama
देश

Priyanka Gandhi : प्रियांका गांधींची लोकसभेतील एन्ट्री लांबणार; वायनाडच्या निवडणुकीवर आयोगाचा खुलासा

Rajanand More

New Delhi : काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांची लोकसभेतील एंट्री लांबणार असल्याचे शुक्रवारी स्पष्ट झाले. वायनाड लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक कधी होणार, याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाकडून स्पष्टपणे उत्तर देण्यात आले नाही. त्यामुळे आता ही निवडणूक कधी होणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

वायनाड लोकसभा मतदारसंघातून राहुल गांधी विजयी झाले होते. त्यांनी रायबरेली मतदारसंघातूनही विजय मिळवला होता. त्यामुळे त्यांनी वायनाड मतदारसंघातील सदस्यत्वाचा राजीनामा दिला. तेव्हापासून ही जागा रिक्त आहे. या जागेसाठी काँग्रेसकडून प्रियांका गांधी निवडणूक लढणार असल्याचे यापूर्वीच जाहीर करण्यात आले आहे.

वायनाड या एकमेव लोकसभा मतदारसंघासह देशभरातील 46 विधानसभा मतदारसंघातही पोटनिवडणूक होणे अपेक्षित आहे. याची घोषणाही शुक्रवारी होण्याची शक्यता होती. मात्र, आयोगाकडून केवळ जम्मू-काश्मीर आणि हरियाणात निवडणुकीची घोषणा करताना एकही पोटनिवडणूक जाहीर केली नाही.

याबाबत स्पष्टीकरण देताना कोणत्याही मतदारसंघाचा उल्लेख न करता मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले, एकूण 47 मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. त्यापैकी एक लोकसभा मतदारसंघ आहे. तिथे मोठी नैसर्गिक आपत्ती आली आहे. तर काही भागातही पूरस्थिती आहे. ही स्थिती सुधारून तेथील लोकांना स्थिरस्थावर होऊ द्या. त्यानंतर एकाचवेळी सर्व 47 मतदारसंघात निवडणूक घेतली जाईल. केवळ एखाद्या मतदारसंघात मतदान होणार नाही. सहा महिन्यांच्या आत निवडणूक घेतली जाईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

दरम्यान, वायनाडमध्ये काही दिवसांपूर्वी भूस्खलनामुळे मोठी जीवितहानी झाली आहे. तब्बल 400 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही घटनास्थळी भेट दिली आहे. मोठ्या प्रमाणात नुकसानही झाले असून तेथील स्थिती सुधारण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागू शकतो. त्यामुळेच आयोगाकडून वायनाडमधील निवडणूक इतक्यात घेतली जाणार नाही, हे स्पष्ट आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT