New Delhi : मागील अनेक वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या जम्मू आणि काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीचा बिगुल अखेर शुक्रवारी वाजला. त्यासोबत हरियाणामध्येही निवडणूकीची घोषणा केंद्रीय निवडणूक आयोगाकडून शुक्रवारी करण्यात आली.
जम्मू आणि काश्मीरमध्ये तीन टप्प्यांत निवडणूक होणार आहे. पहिल्या टप्प्यातील मतदान 18 सप्टेंबर, दुसऱ्या टप्प्यांतील 25 सप्टेंबर आणि अखेरच्या टप्प्यातील मतदान 1 ऑक्टोबर रोजी होणार आहे. हरियाणामध्ये एकाच टप्प्यात 1 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. दोन्ही राज्यांतील मतमोजणी 4 ऑक्टोबर रोजी होईल.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी निवडणुकीची घोषणा केली. जम्मू आणि काश्मीरमध्ये 2014 मध्ये अखेरची निवडणूक झाली होती. 2018 मध्ये सरकार कोसळल्यानंंतर मागील सहा वर्षांपासून राज्यपाल राज्याचे कामकाज पाहत आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांकडून लवकरात लवकर निवडणूक घेण्याची मागणी केली जात होती.
लोकसभेत 58 टक्क्यांहून अधिक मतदान जम्मू आणि काश्मीरमध्ये झाले होते. त्यामुळे 370 कलम हटवल्यानंतर मतदारांमधील उत्साह वाढल्याचे निरीक्षण केंद्रीय आयोगाकडून नोंदवण्यात आले होते. 2019 च्या तुलनेत मतदानात मोठी वाढ झाली. एकाही मतदान केंद्रावर हिंसाचाराची गंभीर घटना घडली नाही.
विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात 11 हजार 838 मतदान केंद्र असतील. त्यामध्ये शहरी भागात 9 हजार 506 तर ग्रामीण भागात 2 हजार 332 मतदान केंद्रांवर मतदान होईल. लोकसभेप्रमाणेच या निवडणुकीतही मतदारांमध्ये उत्साह असेल, असा विश्वास राजीव कुमार यांनी व्यक्त केला.
हरियाणामध्ये 2.01 कोटी मतदार आहेत. एकूण 20 हजार 629 मतदान केंद्र असणार आहेत. गुडगाव, फरिदाबाद आणि सोनिपत या भागात उंच इमारतींमध्ये तसेच झोपडपट्टी भागात मतदान केंद्र असतील. जम्मू आणि काश्मीरमध्ये 20 ऑगस्ट तर हरियाणामध्ये 27 ऑगस्ट रोजी अंतिम मतदारयाद्या प्रसिध्द केल्या जाणार आहे.
जम्मू आणि काश्मीरमध्ये शेवटची निवडणूक 2014 मध्ये झाली होती. त्यावेळी 87 जागांसाठी 67 टक्के मतदान झाले होते. भाजपला सर्वाधिक 23 टक्के मते आणि 25 जागा मिळाल्या होत्या. पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी दुसऱ्या क्रमांकावर होती. पीडीपीने 22.7 टक्के मतदान मिळवत 28 जागा जिंकल्या होत्या. फारुख अब्दुल्ला यांच्या नॅशनल कॉन्फरन्सला 20.8 टक्के मते आणि 15 जागा तर काँग्रेसला 18 टक्के मते आणि 12 जागा मिळाल्या होत्या.
कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नसल्याने भाजप आणि पीडीपीने आघाडी करत राज्यात सत्ता स्थापन केली होती. मात्र 2018 मध्ये आघाडी तुटली आणि सरकार कोसळले. तेव्हापासून राज्यात राज्यपाल कारभार पाहत आहेत. आता निवडणूक आयोगाकडून निवडणूक जाहीर करण्यात आल्याने राज्याची विधानसभा पुन्हा गजबजणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.