Ramdas Athawale News Sarkarnama
देश

Ramdas Athawale News : आजही बाबासाहेबांच्या 'रिपब्लिकन' पक्षाचे नाव कायम ठेवले...; आठवलेंचा निशाणा कुणावर ?

Ramdas Athawale News : वर्धापनदिन हैद्राबाद येथे साजरा होणार असल्याची माहिती नगर आठवले गटाने दिली...

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar News : संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाची स्थापना केली. बाबासाहेबांच्या नंतर याच'रिपब्लिकन' पक्षाचे अनेक गटांत विभाजन झाले असले तरी बाबासाहेबांच्या मूळ 'रिपब्लिकन' पक्षाचा वर्धापनदिन रामदास आठवले गट दरवर्षी न चुकता याच तारखेला साजरा करतो. (Latest Marathi News)

वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर ज्यांनी कोणी रिपब्लिकन नाव आपल्या पक्षाच्या नावामधून पुसले असले तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन संकल्पनेला तसूभरही फरक पडणार नाही, असे म्हणत आठवले यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे.

यंदा हा वर्धापनदिन हैद्राबाद येथे साजरा होणार असल्याची माहिती नगर आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांनी 'सरकारनामा'शी बोलताना दिली. हैद्राबाद इथे यंदा रिपब्लिकन पक्षाचा 58 वा वर्धापनदिन 3 ऑक्टोबर रोजी नामपल्ली रेल्वे स्टेशनजवळील मुखरामजाही रोडवरील एक्झिबिशन ग्राउंडवर आयोजित करण्यात आला आहे. नगर जिल्ह्यातून हजारो रिपब्लिकन पक्षाचे भीमसैनिक या वर्धापनदिनास उपस्थित असणार असून, त्यादृष्टीने मोठी तयारी नगर जिल्ह्यातून केली असल्याचे सुनील साळवे यांनी सांगितले आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एनडीएमधील महत्त्वाचे घटक पक्षाचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री म्हणून कार्यरत आहेत. पुढील वर्षी 2024 मध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघातून त्यांनी भाजप राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याकडे आग्रही मागणी केली आहे. अशात यंदा होत असलेल्या आरपीआय आठवले गटाच्या 'रिपब्लिकन' पक्षाच्या वर्धापनदिनाला नगर जिल्ह्यातून मोठी तयारी केल्याचे पुढे येत आहे.

यंदाच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने नुकतेच रामदास आठवले यांनी माध्यमांना दिलेले एक वक्तव्य मोठे चर्चेत आहे. "3 ऑक्टोबर 1957 रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची ऐतिहासिक स्थापना झाली, त्यानुसार आम्ही दरवर्षी 3 ऑक्टोबर रोजी रिपब्लिकन पक्षाचा वर्धापनदिन साजरा करतो. ज्यांनी कोणी रिपब्लिकन नाव आपल्या पक्षाच्या नावामधून पुसले असले तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रिपब्लिकन संकल्पनेला तो तसूभरही फरक पडणार नाही. आम्ही अंगात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत रिपब्लिकन राहू, आम्ही कधीही आमच्या पक्षाचे नाव बदलणार नाही," असे आठवले यांनी म्हटले आहे. आठवलेंचा नाव न घेता हा टोला कुणाला याची "रिपब्लिकन" पक्षाच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने चर्चा आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT