Truck Carrying Cashew Nuts
Truck Carrying Cashew Nuts  Sarkarnama
देश

माजी मंत्र्याच्या मुलानेच सव्वा कोटींच्या काजूसह ट्रक पळवला

सरकारनामा ब्युरो

चेन्नई : तमिळनाडू मधील तुतीकोरिन ग्रामीण पोलिसांनी काजूने (Cashew Nuts) भरलेला ट्रक अपहरण करताना माजी मंत्र्याच्या मुलाला रंगेहाथ पकडलं आहे. या ट्रकमधील काजू टोकियो येथे निर्यात केले जाणार होते. सुमारे 1 कोटी 20 लाख रुपये किंमतीचे 16.5 टन काजू या ट्रॅकमध्ये होते. या अपहरणामध्ये माजी मंत्र्यांच्या मुलगाच अडकल्याने खळबळ उडाली आहे.

ज्ञानराज जेबासिंह (वय 38) असं माजी मंत्र्याच्या मुलाचं नाव असून त्याच्या इतर सहा साथीदारांनाही अटक करण्यात आली आहे. त्याचे वडील एस. टी. चेलापांडियन हे जयललिता यांच्या मंत्रिमंडलात 2011-16 दरम्यान कामगार मंत्री होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी रात्री 9.30 वाजता कन्याकुमारी जिल्ह्यातील किल्लियूर येथील कारखान्यातून हा ट्रक रवाना झाला होता. तिथून तुतीकोरिन बंदरातून हा काजू टोकियोला पाठवण्यात येणार होता.

हा ट्रक कन्याकुमारी येथून निघाल्यापासून ही टोळी पाठलाग करत होती. देवसेयालपुरम येथे पोहचल्यानंतर टोळीने ट्रकला अडवलं. चालकाला चाकूचा धाक दाखवून ट्रक ताब्यात घेत पळवून नेला. ट्रक मालकाला याबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पुदुकोट्टई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर तूतीकोरिन पोलिसांनी लगेचच ट्रकची शोधाशोध करून पाठलाग सुरू केला.

दरम्यानच्या काळात टोळीने ट्रकचे नाव रंगवून नंबर बदलले होते. पण पोलिसांना सीसीटीव्हीमध्ये वासवपुरम चेक पोस्टवर ट्रकच्या मागे एक एसयूव्ही आढलून आली होती. एसयूव्हीच्या नोंदणी क्रमांकाच्या आधारे गाडीच्या मालकाचा मोबाईल नंबर शोधण्यात आला. पोलिसांनी हा नंबर ट्रॅक केला. शनिवारी पहाटे एका खानावळीमध्ये जेबासिंह यांच्या मुसक्या आवळण्यात आला.

पोलिसांनी माहिती घेतल्यानंतर जेबासिंह हा माजी मंत्र्याचा मुलगा असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी पकडल्यानंतर सुरूवातीला जेबासिंह याने आपण निर्दोष असल्याचा दावा केला. पण नंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याला ताब्यात घेतले त्याठिकाणापासून 25 किमी अंतरावर ट्रक आढळून आला. सुमारे 400 किलोमीटरच्या अंतरात या घडामोडी घडल्या आहेत. पोलिसांनी काही तासांतच जेबासिंहच्या व त्याच्या साथीदारांना पकडलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT