Farmers sets Garlic produce ablaze.

 

Sarkarnama 

देश

भाव न मिळाल्याने शेतकऱ्याने बाजारातच लसूण दिला पेटवून

सरकारनामा ब्युरो

भोपाळ : शेतमालाला भाव मिळत नसल्याने अनेकदा शेतकरी (Farmer) बाजारात आणलेला भाजीपाला तिथेच सोडून जातात. काहीवेळा रस्त्यावर भाज्या फेकून देत आपला संताप व्यक्त केला जातो. एका शेतकऱ्याने थेट बाजारातच सुमारे 160 किलो लसूण (Garlic) पेटवून दिल्याची घटना समोर आली आहे. लसणाला अपेक्षित भाव मिळत नसल्याने शेतकऱ्याने हे पाऊल उचलले आहे.

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) मंदसौर येथील ही घटना आहे. उपलब्ध माहितीनुसार, यावर्षी मंदसौर येथे लसणाचे चांगले उत्पादन झाले आहे. एक शेतकरी उज्जैन जिल्ह्यातून मंदसौर येथील बाजारार लसूण विक्रीसाठी घेऊन आला होता. त्यासाठी त्याने सुमारे पाच हजार रुपये खर्च केला होता. पण त्याला प्रति क्विंटल केवळ 1100 रुपये भाव मिळत होता. खर्च आणि उत्पन्न यात मोठी तफावत होती.

अपेक्षित भाव न मिळाल्याने निराश झालेल्या शेतकऱ्याने बाजारातील एका दुचाकीतील पेट्रोल काढून थेट लसूण पेटवून दिला. या शेतकऱ्याचे नाव शंकर असल्याचे सांगितले जात आहे. त्याच्या या कृतीनंतर इतर शेतकऱ्यांनी जय जवान जय किसान अशी घोषणाबाजी करत त्याच्या कृतीचे समर्थनच केले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर बाजार समितीचे अधिकाऱ्यांनी त्याठिकाणी धाव घेतली.

या घटनेविषयी बोलताना तरूण शेतकरी शंकर म्हणाला, लसूण बाजारात आणण्यासाठी 5 हजार रुपये खर्च केला. पण बाजारात विक्रीतून केवळ 1100 रुपये मिळत होते. त्यामुळे अपेक्षित पैसे मिळत नसतील तर लसूण पेटवून देणं योग्य वाटलं. मी लसणासाठी आतापर्यंत अडीच लाख रुपये खर्च केले आहेत. पण भाव नसल्याने केवळ एक लाख रुपये मिळाल्याचे शंकर याने सांगितले.

या प्रकारानंतर काँग्रेसने (Congress) हा मुद्दा उचलून धरत सरकारवर निशाणा साधला आहे. मध्य प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते नरेंद्र सलूजा यांनी या घटनेचा व्हिडीओ ट्विट करून म्हटले आहे की, कमलनाथ (Kamal Nath) यांनी मंदसौरमध्ये लसणाचे उत्पादन घेणाऱे शेतकरी अडचणी असल्याचे आधीच म्हटले होते. शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नाही, असे ते म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT