Hemant Soren Sarkarnama
देश

Hemant Soren News: 1300 किलोमीटरचा प्रवास, तब्बल 40 तास बेपत्ता...; 'असा' दिला सोरेन यांनी ईडीला गुंगारा!

Anand Surwase

Jharkhand News : झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची कथित जमीन घोटाळा आणि मनी लॉड्रिंगप्रकरणी ईडीकडून चौकशी सुरू आहे. या दरम्यानच सोरेन बेपत्ता झाल्याच्या वावड्यांनी देशभरात खळबळ उडाल्याचा प्रकार समोर आला आहे. ईडीचे अधिकारी 29 जानेवारी रोजी सोरेन यांचा जबाब नोंदवण्यासाठी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी गेले होते.

मात्र, सोरेन त्यांच्या घरी आणि कार्यालयातही उपस्थित नव्हते. त्यामुळे मागील दोन दिवसांपासून हेमंत सोरेन गेले कुठे? हा प्रश्न उपस्थित झाला होता. दिल्लीपासून झारखंडपर्यंत सोरेन नेमके कुठे गेले यावरून खळबळ उडाली होती. अखेर बुधवारी तब्बल 40 तासांनी हेमंत सोरेन हे झारखंडमध्ये दाखल झाले आहेत.

नेमकं प्रकरण काय ?

माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने सोरेन यांची 20 जानेवारी रोजी रांचीमध्ये चौकशी केली होती. त्यानंतर त्यांची पुन्हा चौकशी करण्यात येणार होती. त्यावर सोरेन यांनी 29 जानेवारीला ईडीच्या अधिकाऱ्यांना चौकशीसाठी वेळ दिला होता. पण हेमंत सोरेन हे 27 जानेवारीला रांचीवरून दिल्लीला गेले होते.

29 जानेवारी रोजी ईडीचे अधिकारी सोरेन यांची चौकशी करण्यासाठी सकाळी 7 वाजताच त्यांच्या दिल्ली येथील शांतीनिकेतन निवासस्थानी दाखल झाले होते. मात्र, त्या दिवशी सोरेन त्या ठिकाणी उपस्थित नव्हते. त्यांच्या कार्यालयातही ते नव्हते. ईडीचे अधिकारी तब्बल 13 तास सोरेन यांच्या घर आणि कार्यालयात तळ ठोकून होते.

ईडीची कारवाई

हेमंत सोरेन (Hemant Soren) यांच्या चौकशीसाठी ईडीची अधिकारी सोरेन यांच्या घरी आले असता सोरेन हे बेपत्ता झाले होते. त्यामुळे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सोरेन यांच्या मालमत्तावर छापेमारी केली. या कारवाईत ईडीच्या अधिकाऱ्यांनी 36 लाख रुपये रोख रक्कम आणि 1.3 कोटी रुपये किंमतीची BMW X7 ही लक्झरी कार ईडीच्या अधिकाऱ्यांनी जप्त केली. या दरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांनी सोरेन यांच्या वाहन चालकांची ही चौकशी करण्यात आली. मात्र त्यांच्याकडून फारशी माहिती मिळाली नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सोरेन बेपत्ता झाल्याच्या वावड्या

दरम्यान, ईडीने (ED) त्यांच्या अधिकाऱ्यांकडे चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे फोन बंद करण्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे रांचीवरून 27 तारखेला विमानाने सोरेन नेमके कुठं गेले याचे उत्तर कोणालाच मिळत नव्हते. तसेच त्याचदिवशी ते विमान दिल्ली विमानतळावर दाखल झाले होते. मात्र, सोरेन त्यांच्या निवासस्थानी ईडीच्या अधिकाऱ्यांना आढळून आले नव्हते. त्यामुळे सोशल मीडिया आणि माध्यमांमध्ये हेमंत सोरेन हे बेपत्ता झाल्याच्या बातम्यांचे पेव फुटल्याचे पाहायला मिळाले होते.

बेपत्ता झाल्याचे पोस्टर

हेमंत सोरेन यांच्या या अनुपस्थितीबाबत सोशल मीडियामध्ये मीम्सचा पाऊस सुरू झाला. मुख्यत्वे भाजपच्या आयटी टीमकडून सोरेन बेपत्ता असल्याच्या पोस्ट केल्या जात होत्या. त्यामध्ये भाजपचे झारखंडच्या अध्यक्षांनी झारखंडचे मुख्यमंत्री बेपत्ता झाल्याचे एक पोस्टरच शेअर केले. त्यामध्ये त्यांनी मुख्यमंत्री सोरेन बेपत्ता झाले असून कोणाला आढळून आले असेल तर माहिती द्यावी, माहिती देणाऱ्यास 11,000 रुपये बक्षीस देण्यात येईल असे उपरोधिक पोस्टर शेअर करण्यात आले.

मध्यरात्रीच बाहेर पडले सोरेन

सोरेन हे 27 जानेवारीला दिल्लीत त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. मात्र ते त्याच दिवशी मध्यरात्रीच्या सुमारास घरातून शॉल गुंडाळून बाहेर पडले होते. विशेष म्हणजे ते गाडीने न जाता चालत गेले होते. त्यामुळे ईडीच्या अधिकाऱ्यांना चौकशीसाठी सोरेन उपलब्ध झाले नाहीत. दरम्यान, त्यांच्या सोबत असलेले सुरक्षा अधिकारी हे 28 जानेवारीलाच रांचीमध्ये दाखल झाले होते. मात्र त्यांनाही सोरेन यांच्याबाबत काही माहिती उपलब्ध नसल्याचा प्रकार समोर आला.

29 जानेवारीला रांचीत अवतरले सोरेन

दरम्यान, या सगळ्या गदारोळात हेमंत सोरेन हे 29 जानेवारीला दुपारी रांचीमध्ये त्यांच्या निवासस्थानी आढळून आले. बेपत्ता झालेल्या वावड्या उठत असताना मुख्यमंत्री सोरेन हे रस्ते मार्गाने दिल्ली ते रांची असा 1300 किमीचा प्रवास करत दाखल झाले होते. ते परत आल्यानंतर आपल्या आमदारांना अशा पद्धतीने भेटले की जणू काहीच झाले नाही. मात्र, मागील 40 तास ते कुठे बेपत्ता झाले होते, यावर त्यांच्याकडून काही प्रतिक्रिया देण्यात आली नाही. याबाबत सोरेन यांना पत्रकारांनी तुम्ही कुठे होता असा सवाल केला असता, तर मी तुमच्या हृदयात होतो असे उत्तर सोरेन यांनी दिले.

भाजप नेत्याची पोस्ट...

भाजप नेते निशिकांत दुबे यांनी मुख्यमंत्री सोरेन बेपत्ता झाल्याच्या अफवावर पोस्ट केली होती. हेमंत सोरेन यांनी आपल्या सर्व आमदारांना रांचीमध्ये एकत्र येण्यास सांगितले आहे. त्यांच्या माहितीनुसार सोरेन हे पत्नी कल्पना सोरेन यांना मुख्यमंत्री करण्याच्या तयारीत आहेत. जेणेकरून अटक झाली तरी ते झारखंडमधील सत्ता टिकवू शकतील, असा अंदाज दुबे यांनी व्यक्त केला होता.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT