Dr. Manmohan Singh File Photo
देश

डॉ. मनमोहनसिंगांच्या प्रकृतीत सुधारणा; 'एम्स'चे डॉक्टर म्हणतात...

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांना 13 ऑक्टोबरला भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत दाखल करण्यात आले आहे.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग (Manmohan Singh) यांना 13 ऑक्टोबरला भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (AIIMS) दाखल करण्यात आले आहे. डॉ. सिंग यांना डेंगीची लागण झाली होती. त्यांची प्रकृती आता सुधारत आहे, अशी माहिती एम्समध्ये त्यांच्यावर उपचार करणारे डॉ. नितीश नाईक यांनी दिली आहे.

हृदयरोगतज्ञ डॉ.नितीश नाईक यांच्या नेतृत्वाखालील पथक डॉ.सिंग यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे. डॉ.नितीश नाईक म्हणाले की, डॉ.सिंग यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे. त्यांनी कोरोना लशीचे दोन्ही डोस घेतले आहेत. पहिला डोस त्यांनी ४ मार्चला आणि दुसरा डोस ३ एप्रिलला घेतला होता. डॉ.सिंग यांना ताप आणि अशक्तपणा जाणवत होता. त्यामुळे त्यांना 13 ऑक्टोबरला तातडीने एम्समध्ये हलवण्यात आले होते. त्यांना डेंगीची लागण झाली आहे. रुग्णालयातील कार्डिओ-न्युरो सेंटरमधील वॉर्डमध्ये डॉ.सिंग यांच्यावर उपचार सुरू आहेत.

डॉ.सिंग यांना एम्समध्ये दाखल केल्यानंतर केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी 14 ऑक्टोबरला रुग्णालयाला भेट दिली होती. त्यांनी डॉ.सिंग यांच्या प्रकृतीची विचारपूस करीत त्यांच्यावरील उपचारांचीही माहिती घेतली होती. त्यांच्या या भेटीवरून मोठा गदारोळ झाला होता. या भेटीचा त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेला फोटोही अखेर डिलिट करावा लागला होता. नंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही एम्समध्ये जाऊन डॉ.सिंग यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.

डॉ. सिंग यांना याच वर्षी कोरोनाचा संसर्ग झाला होता. त्यावेळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोरोना प्रादुर्भावाच्या दुसऱ्या लाटेत ते कोरोनाबाधित झाले होते. त्यांना 19 एप्रिलला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते कोरोनाशी यशस्वी झुंज देऊन 29 एप्रिलला रुग्णालयातून बाहेर पडले होते. मागील वर्षी मे महिन्यात डॉ. सिंग यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्यावर कार्डिओ थोरॅसिक विभागात उपचार सुरू होते. डॉ. सिंग यांच्यावर 2009 मध्ये ‘एम्स’मध्येच बायपास शस्त्रक्रिया करण्यात आली होती. डॉ.मनमोहनसिंग हे 89 वर्षांचे आहेत. ते राज्यसभा सदस्य आहेत. ते राजस्थानमधून राज्यसभेवर गेले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT