नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांत (Assembly Elections) काँग्रेसला (Congress) मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय कायदा मंत्री डॉ.अश्वनी कुमार (Ashwani Kumar) यांनी महिनाभरापूर्वी पक्षाला रामराम केला होता. आता त्यांनी काँग्रेसच्या कामगिरीवरून पक्षाला आरसा दाखवला आहे. काँग्रेस राष्ट्रीयवरून प्रादेशिक पक्ष बनू लागला आहे, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली आहे.
अश्वनी कुमार म्हणाले की, काँग्रेसच्या कामगिरीबद्दल मी अजिबात समाधानी नाही. पक्षाचा भविष्यात राजकीय संबंध दुर्लक्ष करण्यासारखाच राहील. देशातील बदलत्या राजकीय घडामोडी पाहता काँग्रेस हा प्रादेशिक पक्ष बनेल. आम आदमी पक्षाने पंजाबमध्ये चांगली कामगिरी केली आहे. या निकालाने राजकीय चित्र पालटणार आहे. आप पंजाबमध्ये सत्तेत येईल, हे मी आधीच सांगितले होते. जनता आता प्रस्थापित पक्षांना कंटाळली आहे. जनतेला आता तरुणांचा भारत आणि नवीन राजकारण हवे आहे. दिल्लीत केलेल्या कामाचे पळ पंजाबमधील जनतेने अरविंद केजरीवाल यांना दिले आहे.
माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या सरकारमध्ये अश्वनी कुमार हे कायदा मंत्री होते. ते तब्बल 40 वर्षे काँग्रेसमध्ये होते. त्यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे मागील महिन्यात राजीनामा पाठवला होता. त्यात त्यांनी म्हटले होते की, मी अतिशय विचारपूर्वक हा निर्णय घेत आहे. सध्याच्या परिस्थितीचा विचार करून आणि माझा सन्मान कायम ठेवण्यासाठी हा निर्णय घेत आहे. पक्षाच्या बाहेर राहून व्यापक देशहिताचे काम करण्याचा माझा मानस आहे.
दरम्यान, उत्तर प्रदेशच्या निवडणुकीआधी माजी केंद्रीय राज्यमंत्री आर. पी. एन. सिंह (R. P. N. Singh) हेसुद्धा काँग्रेस सोडून भाजपमध्ये (BJP) दाखल झाले होते. सिंह यांच्या रुपाने काँग्रेसच्या यंग ब्रिगेडमधील आणखी एक मोहरा गळाला होता. काँग्रेस जाहीर केलेल्या तीस जणांच्या स्टार प्रचारकांच्या यादीत सिंह यांचाही समावेश करण्यात आला होता. पण लगेचच त्यांनी पक्षाला रामराम ठोकल्याने मोठा धक्का बसला होता. भाजपने स्टार प्रचारकालाच गळाला लावल्याने राजकीय चर्चांना उधाण आले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.