P. Chidambaram Sarkarnama
देश

पेट्रोल, डिझेलचे कर कमी झाले अन् पी.चिदंबरम म्हणाले, आमचं म्हणणं खरं ठरलं!

अखेर मोदी सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील करात कपात करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : देशात सध्या महागाईचा भडका उडाला आहे. पेट्रोल (Petrol) आणि डिझेलच्या (Diesel) दरवाढीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. यामुळे अखेर मोदी सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील करात कपात करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यावर काँग्रेस (Congress) नेते व माजी केंद्रीय अर्थमंत्री पी.चिदंबरम (P.Chidambaram) यांनी भाष्य केले आहे.

चिदंबरम यांनी यांनी पेट्रोल, डिझेलच्या कर कपातीचा संबंध देशात झालेल्या 3 लोकसभा आणि 30 विधानसभा पोटनिवडणुकांशी जोडला आहे. ते म्हणाले की, पोटनिवडणुकीतील निकालांचे हे फलित आहे. पेट्रोल, डिझेलवरील जादा करामुळेच त्यांचे दर गगनाला भिडले आहेत. केंद्र सरकारच्या लोभी वृत्तीमुळे जनतेचे हाल होत आहेत. देशात 3 लोकसभा आणि 30 विधानसभा पोटनिवडणुकांत फटका बसताच सरकारला जाग आली. त्यामुळे तातडीने ही कर कपात करण्यात आली. जास्त करामुळे पेट्रोल, डिझेल दर जास्त आहेत, हे आमचे म्हणणे अखेर सरकारने खरे करून दाखवले आहे.

मोदी सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात (Excis Duty) 5 रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात 10 रुपये कपात केली आहे. यामुळे केंद्र सरकारला चालू आर्थिक वर्षात 1.4 लाख कोटी रुपयांच्या उत्पादन शुल्कावर पाणी सोडावे लागेल. देशात 3 लोकसभा आणि 30 विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुका झाल्या आहेत. यात काही ठिकाणी भाजपला फटका बसला. सर्वाधिक फटका हिमाचल प्रदेशमध्ये बसला होता. हिमाचलचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी जाहीरपणे याचे खापर महागाईवर फोडले होते. याचबरोबर पश्चिम बंगालमध्ये भाजपचे चारही उमेदवार पराभूत झाले होते. कर्नाटक आणि हरियानातील प्रतिष्ठेच्या लढतीततही भाजपला हार पत्करावी लागली होती.

पुढील वर्षी 7 राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये गोवा, मणिपूर, पंजाब, उत्तर प्रदेश, उत्तराखंड या राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये हिमाचल प्रदेश तर डिसेंबरमध्ये गुजरातमध्ये निवडणूक होत आहे. यातील पंजाब वगळता इतर 6 राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचा फटका भाजपला बसणार हे पोटनिवडणुकांतून समोर आले आहे. यामुळे केंद्र सरकारनंतर भाजपशासित राज्यांनीही पेट्रोल, डिझेलवरील करात कपात केली आहे.

देशातील चार राज्ये व एका केंद्रशासित प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या निकाल लागल्यानंतर 2 मेपासून सातत्याने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होत आहे. यामुळे सामान्य नागरिकांना इंधन दरवाढीचे चटके बसत आहेत. देशात 4 मे ते 17 जुलै या कालावधीत पेट्रोलच्या दरात 11.44 रुपये आणि डिझेलच्या दरात 9.14 रुपये वाढ झाली आहे. सलग सात दिवस पेट्रोल, डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे भाव वाढल्याने पुढील काळात पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचा भडका कायम राहण्याची शक्यता आहे. खनिज तेलाचे भाव मागील सात वर्षांतील उच्चांकी पातळीवर आहेत. खनिज तेलाचा भाव वाढल्याने आगामी काळात देशात इंधन दरवाढीचे चक्र कायम राहणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT