Kalyan Singh political journey Sarkarnama
देश

Kalyan Singh: उत्तरप्रदेशात हिंदुत्व रुजवणारा भाजपचा सर्वात मोठा चेहरा

Kalyan Singh political journey: भाजप सोडून स्वतःचा पक्ष स्थापन केल्याचा फटका कल्याण सिंह यांना बसला. त्यांनी हे पाऊल उचललं नसतं तर त्यांचं स्थान अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवानी यांच्या यादीत राहिलं असतं.

अय्यूब कादरी

Kalyan Singh’s role in BJP: 1990 च्या दशकाची सुरुवात होती. भारतीय राजकारणात मोठ्या उलथापालथी सुरू झाल्याचा तो काळ होता. मंडल-कमंडल, रामजन्मभूमी-बाबरी मशीद आंदोलनाने राजकारणाला व्यापून टाकलं होतं.

मंडल आयोगानं केलेल्या शिफारशींचं देशभरातून समर्थन केलं जात होतं. त्याचप्रमाणं त्या शिफारशींनी विरोधही केला जात होता. रामजन्मभूमी आंदोलनानंही जोर पकडला होता. भविष्यात होऊ घातलेल्या मोठ्या राजकीय, सामाजिक बदलांची ती नांदी होती.

कारसेवक अयोध्येतील बाबरी मशिदीकडे निघाले होते. त्यांना अडवण्यासाठी उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांनी तगडा बंदोबस्त तैनात केला होता. तरीही कारसेवक मशिदीकडे जाण्याचा प्रयत्न करू लागले. 30 ऑक्टोबर 1990 हा तो दिवस होता. कायदा हातात घेऊ पाहणाऱ्या कारसेवकांना रोखण्यासाठी त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यात अनेक कारसेवकांचा मृत्यू झाला. यानंतर मुलायमसिंह यादव यांचा सामना करण्यासाठी भाजपनं कल्याण सिंह यांना समोर केलं. त्याचा परिणाम झाला. वर्षभरानंतर झालेल्या उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

कल्याण सिंह मुख्यमंत्री बनले. मुख्यमंत्री बनल्यानंतर त्यांनी आपल्या मंत्र्यांसह अयोध्येचा दौरा केला आणि राममंदिराच्या उभारणीचा संकल्प सोडला. कल्याण सिंह मुख्यमंत्री असतानाचा बाबरी मशीद पाडण्यात आली. त्यांच्या मुख्यमंत्रिपदाचा पहिला कार्यकाळ बाबरी मशिदीच्या विध्वंसासाठी ओळखला जातो.

यासह कठोर शिस्त, कुशल प्रशासक अशीही त्यांची ओळख निर्माण झाली. परीक्षांमध्ये गैरप्रकार, कॉपी रोखण्यासाठी त्यांनी कठोर पावलं उचलली, अध्यादेश जारी केला. त्यामुळं सरकारच्या विरोधात नाराजी वाढली, मात्र त्यांनी त्याची पर्वा केली नाही. कल्याण सिंह यांच्या निर्णयामुळं बोर्डाच्या अनेक परीक्षा कॉपीमुक्त झाल्या. नोकरभरतीतही पारदर्शकता आली.

कल्याण सिंह यांचा जन्म 5 जानेवारी 1932 रोजी अलीगढ जिल्ह्यातील अतरौली तालुक्यातील मधौली या गावात एका लोधी कुटुंबात झाला. तेजपाल सिंह हे त्यांचे वडील तर मातुःश्रींचं नाव सीता देवी. त्यांचे कुटुंबीय साधारण शेतकरी होते. शालेय जीवनापासूनच त्यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंध आला.

जनसंघ, जनता पार्टी, राष्ट्रीय क्रांती पार्टी आणि भाजप असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला. अतरौली विधानसभा मतदारसंघातून 1967 मध्ये ते पहिल्यांदा विजयी झाले. त्यानंतर त्यांनी मागं वळून पाहिलं नाही. 1991 मध्ये ते पहिल्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बनले. 1997 मध्ये ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले. ओबीसी समाजातून आलेल्या कल्याणसिंह यांना प्रत्येक जातीची मते मिळायची. उत्तर प्रदेशात हिंदुत्वाचं राजकारण कल्याण सिंह यांच्यामुळंच पहिल्यांदा रुजलं.

1980 मध्ये भाजपची स्थापना झाली. त्यानंतर कल्याण सिंह यांना भाजपचे प्रदेश महामंत्री बनवण्यात आलं. रामजन्मभूमी आंदोलनात त्यांना अटक झाली. या आंदोलनामुळं रामभक्त अशी त्यांची प्रतिमा झाली. उत्तर प्रदेशच नव्हे तर देशभरात त्यांची लोकप्रियता वाढली. त्यामुळंच उत्तर प्रदेशात 1991 मध्ये भाजपचं सरकार आल्यानंतर त्यांना मुख्यमंत्रिपद मिळालं होतं.

कल्याण सिंह हे पहिल्यांदा मुख्यमंत्री असताना 6 डिसेंबर 1992 रोजी अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यात आली होती. त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांच सरकार रात्रीतून बरखास्त करण्यात आलं होतं. असं असलं तरी हिंदुत्वाच्या राजकारणासाठी कल्याण सिंह यांनी उत्तर प्रदेशात जमीन तयार केली होती. पक्षात त्यांची उंची वाढली होती. 1999 मध्ये भाजपनं त्यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवलं, त्यामुळं भाजप सोडून त्यांनी स्वतःचा पक्ष स्थापन केला आणि येथेच त्यांचं मोठं राजकीय नुकसान झालं.

कल्याण सिंह यांच सरकार बरखास्त करण्यात आलं, त्यांच मुख्यमंत्रिपद गेलं, मात्र त्यानंतर उत्तर प्रदेशात कमंडलाचं राजकारण वरचढ ठरायला सुरुवात झाली. पाच वर्षांनंतर भाजप पुन्हा सत्तेत आला आणि कल्याण सिंह दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले, मात्र त्यांना यावेळी पहिल्या कार्यकाळासारखी छाप पाडता आली नाही. दोन वर्षांनंतर भाजपनं त्यांना मुख्यमंत्रिपदावरून हटवलं. त्यामुळं पक्षाच्या नेतृत्वाशी त्यांचा संघर्ष झाला. त्यातूनच ते भाजपमधून बाहेर पडले आणि राष्ट्रीय क्रांती पक्षाची स्थापना केली.

भाजप सोडून स्वतःचा पक्ष स्थापन केल्याचा फटका कल्याण सिंह यांना बसला. त्यांनी हे पाऊल उचललं नसतं तर त्यांचं स्थान अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवानी यांच्या यादीत राहिलं असतं. त्यांनी 2004 मध्ये पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला आणि बुलंदशहर मतदारसंघातून खासदार झाले. 2009 मध्ये ते पुन्हा भाजपमधून बाहेर पडले. एटा लोकसभा मतदारसंघातून अपक्ष लढून विजयी झाले. 2014 मध्ये त्यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला, मात्र तोपर्यंत मुख्य प्रवाहातील राजकारणासाठी पक्षात त्यांच्यासाठी स्पेस उरली नव्हती. त्याच वर्षी त्यांना राजस्थानचं राज्यपाल बनवण्यात आलं.

उत्तर प्रदेशासह देशभरात काँग्रेसचं वर्चस्व होतं. अशा काळात प्रखर हिंदुत्ववादी म्हणून कल्याण सिंह यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली होती. तत्पूर्वी, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी काही काळ शिक्षक म्हणून नोकरीही केली होती. राजकारणात आल्यानंतर 1967 मध्ये ते जनसंघाच्या उमेदवारीवर अतरौली मतदारसंघातून पहिल्यांदा विधानसभेत पोहोचले. पुढे 1980 पर्यंत ते या मतदारसंघातून सलग विजयी झाले. जनसंघाचं जनता पार्टीत विलीनीकरण झालं आणि आणीबाणी उठवल्यानंतर 1977 मध्ये उत्तर प्रदेशात जनता पार्टीचं सरकार स्थापन झालं. या सरकारमध्ये कल्याण सिंह हे आरोग्य मंत्री बनले.

रामजन्मभूमी आंदोलनात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या कल्याण सिंह यांनी भाजप सोडल्यानंतर मात्र हा मुद्दाही सोडून दिला होता. भाजप सोडल्यामुळं त्यांचा विशेष असा काही फायदा झाला नाही, मात्र भाजपचं नुकसान झालं होतं. पक्ष सोडल्यानंतर हिंदुत्ववादी नेता, ही त्यांची ओळख पुसट झाली आणि लोधी समाजाचे नेते, अशी त्यांची ओळख बनली. याची प्रचीती त्यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आली. लोधी समाजाचा प्रभाव असलेल्या भागातच त्यांना प्रचारासाठी पाठवलं जाऊ लागलं होतं.

समाजवादी पक्षाचे संस्थापक, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांच्याशी कल्याण सिंह यांची खास मैत्री होती. बाबरी मशिदीकडे निघालेल्या कारसेवकांवर मुलायम सिंह मुख्यमंत्री असताना गोळीबार झाला होता. कल्याण सिंह मुख्यमंत्री असताना त्यांनी मंत्र्यांसह अयोध्येत जाऊन मंदिर उभारणीचा संकल्प सोडला होता. दोघांच्या विचारसरणीत टोकाची भिन्नता होता. त्यामुळं या मैत्रीचा कल्याण सिंह यांना फटका बसला. हिंदुत्ववादी नेता, अशी त्यांची ओळख पुसट झाली. कल्याण सिंह हे राजकीयदृष्ट्या अडचणीत असताना मुलायम सिंह यांनी त्यांना आधार दिला होता.

कल्याण सिंह हे उत्तर प्रदेशातील भाजपचे सर्वात शक्तिशाली नेते होते, भाजपचा सर्वाच मोठा चेहरा होते. अटलबिहारी वाजपेयी आणि कल्याण सिंह यांच्यात मतभेद होते. अटलजी त्यावेळी पंतप्रधान बनले होते आणि 1999 मध्ये उत्तर प्रदेश भाजपमध्ये कल्याण सिंह यांच्याविरोधात एक गट सक्रिय झाला होता. यामागे अटलजी होते, असं सांगितलं जायचं. कल्याण सिंह यांची परिस्थिती इतकी बिकट झाली की त्यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. 12 नोव्हेंबर 1999 रोजी कल्याण सिंह यांनी राजीनामा दिला आणि रामप्रकाश गुप्त यांची मुख्यमंत्रिपदी निवड करण्यात आली.

मुख्यमंत्रिपद गेल्यानंतर दुखावलेल्या कल्याण सिंह यांनी अटलजी यांच्याविरोधात जाहीर वक्तव्ये सुरू केली. विशेष म्हणजे, विरोधकही अटलजींचा सन्मान करायचे, त्यांच्यावर टीका करताना मर्यादा पाळायचे. कल्याण सिंह मात्र मर्यादा पाळत नव्हते. त्यामुळे कल्याण सिंह यांची 6 वर्षांसाठी भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर त्यांनी राष्ट्रीय क्रांती पक्ष स्थापन केला. 2002 च्या विधानसभा निवडणुकीत या पक्षाचे चार आमदार निवडून आले. त्यावेळी मुलायम सिंह यांच्या नेतृत्वाखालील समाजवादी पक्षाचं आघाडीचं सरकार स्थापन झालं. या सरकारमध्ये कल्याण सिंह यांचा पक्ष सहभागी झाला.

कल्याण सिंह यांनी 2004 मध्ये घरवापसी केली, मात्र 2007 मध्ये भाजपची सत्ता येऊ शकली नाही. या निवडणुकीत बहुजन समाज पक्षाची सत्ता आली. मायावती मुख्यमंत्री बनल्या. त्यामुळं कल्याण सिंह बाजूला फेकले गेले. परिणामी, ते 2009 मध्ये पुन्हा भाजपमधून बाहेर पडले. त्यानंतर ते मुलायम सिंह यांच्या आणखी जवळ गेले. हे दोघे कार्यक्रमांत एका व्यासपीठावर दिसू लागले. त्यामुळे समाजवादी पक्षातून मुलायम सिंह यांना विरोध होऊ लागला, मात्र ते शांत राहिले. प्रखर हिंदुत्ववादी नेते कल्याण सिंह यांना सोबत घेणं समाजावादी पक्षाच्या नेत्यांना आवडलेलं नव्हतं.

परिस्थिती बदलली आणि कल्याण सिंह 2014 मध्ये पुन्हा एकदा भाजपमध्ये परतले. त्याच वर्षी केंद्रात भाजपचं सरकार आलं आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान बनले. त्यानंतर त्यांना राजस्थानचx राज्यपाल बनवण्यात आलं. 2015 मध्ये त्यांना हिमाचल प्रदेशच्या राज्यापालपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला. आता आयुष्यात पुन्हा कधीही भाजप सोडणार नाही, अशी प्रतिज्ञा कल्याण सिंह यांनी केली. तिकडे, कल्याण सिंह यांच्याशी हातमिळवणी करणे, ही आपली सर्वात मोठी चूक होती, असे नंतर मुलायम सिंह यांनीही मान्य केलं होतं. त्यामुळं समाजवादी पक्षाचं नुकसान झालं. त्यानंतर मुलायम सिंहांनी कल्याण सिंहांशी संबंध तोडले.

कल्याण सिंह यांचे राजकीय वजन किती वाढलेले होते, याची काही उदाहरणे पाहता येतील. कल्याण सिंह यांनी अटलजींबद्दल सातत्यानं अपमानजनक भाषा वापरली होती. तरीही 2004 मध्ये त्यांना भाजपमध्ये परत आणण्यासाठी अटलजींनी प्रयत्न केले होते. नरेंद्र मोदी हे राष्ट्रीय स्वयंसेवक सघांचे प्रचारक होते, त्यावेळी कल्याण सिंह यांच्याशी चर्चा करण्यासाठी त्यांना पाठवण्यात आलं होतं. कल्याण सिंह यांनी भेटीसाठी मोदींना लवकर वेळ दिली नव्हती. अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मोदींना त्यांच्या भेटीची वेळ मिळाली होती.

या भेटीत मोदी त्यांच्याशी एकांतात चर्चा करू इच्छित होते, मात्र कल्याण सिंह यांनी त्याला नकार दिला. काही लोकांच्या उपस्थितीतच त्यांनी चर्चा केली. मुलायम सिंह यांच्यासोबत सत्तेत असताना कल्याण सिंह यांच्या पक्षाचे कुसुम राय यांना मंत्रिपद मिळालं होतं. कल्याण सिंह यांच्या राजकीय घसरणीला राय मोठ्या प्रमाणात जबाबादार होते, असं सांगितलं जात. या भेटीत मोदी यांनी राय यांचा मुद्दा उपस्थित केला, मात्र कल्याण सिंह यांनी त्याकडं साफ दुर्लक्ष केलं आणि मोदींच्या समोरच अटलजींबद्दल अवमानकारक भाषा वापरली होती, असं सांगितलं जातं.

पक्षातून आत -बाहेर केल्यामुळं कल्याण सिंह यांचं प्रचंड राजकीय नुकसान झालं. एकदा तर असा प्रसंग उद्भवला की निवडणुकीच्या प्रचार दौऱ्यासाठी त्यांना हेलिकॉप्टर हवं होतं, मात्र ते कुणीही उपलब्ध करून दिलं नाही. दोनवेळा भाजप सोडून आपलं किती नुकसान झालं आहे, याचा अंदाज त्यावेळी कल्याण सिंह यांना आला. राजकीय नेत्यांना महत्वाकांक्षा असतेच. याच महत्वाकांक्षेमुळं कल्याण सिंह यांच मात्र अतोनात नुकसान झालं आणि त्यांची राजकीय कारकीर्द अवेळी घसरणीला लागली. त्यांचे पुत्र राजवीर सिंह हे 2014 मध्ये एटा लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून विजयी झाले होते.

बाबरी मशिदीच्या विध्वंसप्रकरणी कल्याण सिंह यांच्यावर न्यायालयाच्या अवमानाचा खटला दाखल करण्यात आला होता. त्यात त्यांना एक दिवसाचा कारावास आणि 20 हजार रुपये दंडाची शिक्षा झाली होती. बाबरी मशीद पाडल्याच्या प्रकरणात लालकृष्ण अडवानी, कल्याण सिंह आदींवर गुन्हा दाखल झाला होता. कालांतरानं या खटल्यातून त्यांची मुक्तता झाली. श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याने 3 जुलै 2021 रोजी कल्याण सिंह यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. वयाच्या 90 व्या वर्षी 21 ऑगस्ट 2021 रोजी त्यांच निधन झालं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT