Buddhadev Bhattacharya Sarkarnama
देश

Buddhadev Bhattacharya : बुध्ददेव भट्टाचार्य यांचे निधन; 11 वर्ष होते पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री

Rajanand More

Kolkata : पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुध्ददेव भट्टाचार्य यांचे गुरूवारी सकाळी निधन झाले. मागील अनेक दिवसांपासून त्यांची तब्बेत ठीक नव्हती. त्यांनी 80 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी 2000 ते 2011 या अशी 11 वर्षे आपली कारकीर्द गाजवली होती.

सीपीआय (एम) पक्षाचे राज्य सचिव मोहम्मद सलीम यांनी भट्टाचार्य यांच्या निधनाची माहिती दिली. बुध्ददेव भट्टाचार्य हे कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) या पक्षाच्या पॉलिट ब्युरोचे सदस्य होते. पक्षातील अनेक धोरणात्मक निर्णयांमध्ये त्यांची भूमिका महत्वाची मानली जात होती.

तब्बेतीमुळे मागील काही वर्षांपासून ते पक्षात सक्रीय नव्हते. 2015 मध्ये त्यांनी पॉलिट ब्युरो आणि केंद्रीय समितीचा राजीनामा दिला होता. कोलकाता येथील घरीच त्यांच्यावर उपचार सुरु होते. तब्बेत अधिक खालावल्याने त्यांना जुलै महिन्यात रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यामागे पत्नी व एक मुलगी आहे.

कोण आहेत बुध्ददेव भट्टाचार्य?

बुध्दवेव भट्टाचार्य यांचा जन्म 1 मार्च 1944 रोजी उत्तर कोलकातामध्ये झाला होता. त्यांच्या पुर्वजांचे घर बांग्लादेशमध्ये आहे. कोलकाता येथील प्रतिष्ठित प्रसिडेंसी कॉलेजमध्ये बंगाली साहित्याचे शिक्षण घेतले. बंगाली (ऑनर्स) या विषयात बीए ही पदवी प्राप्त केली होती. शिक्षण घेत असतानाच ते सीपीआयशी जोडले गेले.

सीबीआयच्या यवा शाखेच्या डेमोक्रेटिक यूथ फेडरेशनचे राज्य सचिव म्हणून भट्टाचार्य यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानंतर या फेडरेशनचे डेमोक्रेटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडियामध्ये विलीनीकरण करण्यात आले.

बुध्ददेव भट्टाचार्य यांनी बंगालमध्ये औद्योगिकीरणाच्या मोहिमेला सुरूवात केली होती. त्यासाठी त्यांनी विदेशी व राष्ट्रीय कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी खूप प्रयत्न केले. त्यामध्ये टाटा कंपनीचाही समावेश होता. या कंपनीच्या नॅनो कारचा प्रकल्प सिंगूरमध्ये सुरू झाला होता. त्यावरून नंतर बराच वादही झाला. याशिवाय इतर काही प्रकल्पांनाही विरोधाचा सामना करावा लागला.

2009 च्या लोकसभा निवडणुकीत भट्टाचार्य यांच्या पक्षाचा मोठा पराभव झाला. तसेच 2011 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनाही पराभवाचा धक्का बसला होता. तृणमूल काँग्रेचे उमेदवार मनीष गुप्ता यांनी त्यांचा 16 हजार 648 मतांनी पराभव केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT