लंडन : ‘जी-७’ (G 7 countries) या गटातील विकसित देशांनी रशियाकडून (Russia) तेलाची आयात टप्प्याटप्प्यांत बंद करण्याचा किंवा तत्काळ आयात थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. युक्रेनला समर्थन व्यक्त करण्यासाठी आज झालेल्या ऑनलाइन बैठकीत युक्रेनचे अध्यक्ष व्होलोदीमिर झेलेन्स्की हे देखील उपस्थित होते. (Russia-Ukraine warupdate)
दुसऱ्या महायुद्धात १९४५ मध्ये नाझी जर्मनीने शरणागती पत्करल्याची आठवण म्हणून युरोपमध्ये आज ‘युरोप दिन’ (Europe Day) साजरा केला जातो. या दिवशी एकतेचे प्रदर्शन करत जी-७ देशांनी रशियाची आणखी कोंडी करण्याचा निर्णय घेतला. तेल निर्यातीतून रशियाला प्रचंड पैसा मिळत असल्याने त्यांचा हा उत्पन्नाचा स्रोतच बंद करून आर्थिक नस दाबण्याचा जी-७ देशांचा इरादा आहे. जी-७ देशांमध्ये अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, जर्मनी, फ्रान्स, इटली आणि जपान यांचा समावेश आहे. रशियाकडून तेल आयात टप्प्याटप्प्यांत बंद करून पर्यायी व्यवस्था निर्माण केली जाईल, असे या गटाने आज जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.
युक्रेन युद्धात पुतीन यांचा विजय होणार नाही, यासाठी सर्वोतोपरी काळजी घेण्याचा निर्धार जी- ७ देशांनी व्यक्त केला. ‘दुसऱ्या महायुद्धात स्वातंत्र्यासाठी लढलेल्या सर्वांचे स्मरण ठेवून आपण आजही त्याच कारणासाठी लढायला हवे. ही लढाई युक्रेनसाठी, युरोपसाठी आणि जगासाठी आहे,’ असे निवेदनात म्हटले आहे.
रशियाची युरोपीयन राष्ट्रांवर तोफ
रशियाच्या ‘विजय दिना’च्या कार्यक्रमात अध्यक्ष व्लादीमिर पुतीन यांनी अमेरिका आणि युरोपमधील देशांवर तोफ डागली. पाश्चिमात्य देशांच्या धोरणांमुळेच युक्रेनवर लष्करी कारवाई करणे भाग पडले, असा दावा पुतीन यांनी केला. तसेच त्यांनी सध्याच्या युद्धाची तुलना नाझी जर्मनीविरोधातील युद्धाबरोबर करत युक्रेनवरील आक्रमणाचे समर्थन केले.
दुसऱ्या महायुद्धात रशियाने नाझी जर्मनीवर मिळविलेल्या विजयाची आठवण म्हणून नऊ मे हा दिवस रशियात ‘विजय दिन’ म्हणून साजरा केला जातो.
या निमित्त मॉस्कोमध्ये झालेल्या संचलनात अनेक अत्याधुनिक शस्त्रे, लष्करी वाहने आणि क्षेपणास्त्रे सहभागी करत आपल्या सामर्थ्याचे प्रदर्शन केले. पुतीन म्हणाले,‘‘आमच्या देशाच्या सीमेवरच धोका निर्माण होऊ देणे आम्हाला अमान्य आहे. त्यामुळेच युक्रेनवर अत्यंत योग्य वेळी आणि आवश्यकच असलेली कारवाई केली. कारवाईचा हा निर्णय सार्वभौम, सामर्थ्यशाली आणि स्वतंत्र देश म्हणून आम्ही घेतला. पाश्चिमात्य देशांच्या धोरणांमुळेच आम्हाला युक्रेनवर कारवाई करणे भाग पडले.’’
‘नाटो’ संघटनेने त्यांच्या विस्तारवादी धोरणाला वेसण घालावी आणि सुरक्षेची हमी द्यावी, या रशियाच्या मागण्याय मान्य न झाल्यानेच युक्रेनवर कारवाई करण्याशिवाय रशियाला पर्याय राहिला नव्हता, असा दावा पुतीन यांनी केला. रशियाच्या संरक्षणासाठी आमचे सैनिक युक्रेनमध्ये लढत असल्याचेही ते म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.