परत एकदा वाढत्या महागाईने त्रस्त झालेल्या व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी एलपीजी गॅस सिलिंडरच्या किमतींबाबत महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यात आला. तेल विपणन कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात मोठी कपात केली असून हॉटेल, रेस्टॉरंट, खाद्यव्यवसाय आणि छोट्या उद्योगांसाठी ही आनंदाची बातमी ठरली आहे.
नव्या दरानुसार 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत तब्बल 183.50 रुपयांनी कमी करण्यात आली आहे. यामुळे यापूर्वी 3113.50 रुपये असलेला सिलिंडर आता 2930 रुपयांना उपलब्ध होणार आहे. गेल्या काही महिन्यांत सातत्याने वाढलेल्या दरांमुळे व्यापारी वर्गावर आर्थिक ताण निर्माण झाला होता. मात्र या कपातीमुळे त्यांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मध्यपूर्वेतील भूराजकीय तणाव आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतार यांचा परिणाम एलपीजीच्या दरांवर झाला होता. त्यामुळे व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतींमध्ये सलग वाढ पाहायला मिळाली. विशेषतः मार्च महिन्यात दोन वेळा दरवाढ करण्यात आली होती. 1 मार्च रोजी 28 रुपयांची वाढ करण्यात आली होती, तर 7 मार्च रोजी आणखी 114.50 रुपयांनी किंमत वाढली होती.
दरम्यान, व्यावसायिक सिलिंडर स्वस्त झाला असला तरी घरगुती ग्राहकांना मात्र अद्याप कोणताही दिलासा मिळालेला नाही. 14.2 किलोच्या घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सध्या मुंबईत 941.50 रुपये आहे.
व्यावसायिक एलपीजीच्या दरात 2026 मधील ही पहिली मोठी कपात मानली जात असून आगामी काळात घरगुती सिलिंडरच्या किमतीतही काहीसा दिलासा मिळतो का, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.