Congress Latest Marathi News, Goa Congress News
Congress Latest Marathi News, Goa Congress News Sarkarnama
देश

माजी मुख्यमंत्री अन् माजी विरोधी पक्षनेत्यावर अपात्रतेची टांगती तलवार; काँग्रेसचं मोठं पाऊल

सरकारनामा ब्युरो

पणजी : गोवा काँग्रेसमध्ये बंडाचे वारे वाहत असून अकरापैकी काही आमदार भाजपच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्यानंतर रविवारी अनेक राजकीय घडामोडींनंतर पक्षाने विरोधी पक्षनेत्याला पदावरून हटवलं. आता त्यांच्यासह माजी मुख्यमंत्र्यांवर अपात्रतेची कारवाई करण्याबाबतची प्रक्रिया सुरू केल्याने काँग्रेसमध्ये पुन्हा भूकंप होण्याची शक्यता आहे. (Congress Latest Marathi News)

पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत गोवा (Goa) काँग्रेसने माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत (Digambar Kamat) आणि मायकल लोबो (Michael lobo) यांच्याविरोधात अपात्रतेच्या कारवाईची याचिका दाखल केली आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांची आमदारकी संकटात आली आहे. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी या कारवाईबाबत माहिती दिली.

पक्षविरोधी कारवाया करणे म्हणजे पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देण्यासारखे आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गोवा प्रभारींनी कामत आणि लोबो यांना आमदार म्हणून अपात्र ठरवण्याची मागणी विधानसभेचे सभापती रमेश तवडकर यांच्याकडे केल्याचे पाटकर म्हणाले.

कामत आणि लोबो यांनी पक्षातील अकरापैकी आठ आमदार फोडण्याचा प्रयत्न केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. दोन तृतीयांश आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश केल्यास अपात्रतेची कारवाई होणार नाही, यासाठी प्रयत्न केले जात होते. पण त्यांच्याबाजूने केवळ पाचच आमदार आले, अशी माहिती सुत्रांनी सांगितले.

कामत आणि लोबो यांच्या बंडाच्या प्रयत्नानंतर दोघांवरही पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. मायकल लोबो यांची गटनेता आणि विरोधी पक्षनेतेपदावरून उचलबांगडी करण्यात आली. या दोन्ही नेत्यांवर पक्षांतर बंदी कायद्याच्या प्रक्रियेतून जी काही कारवाई असेल ती होणार असल्याची घोषणा गोवा काँग्रेसचे प्रभारी दिनेश गुंडू राव यांनी रविवारीच केली होती.

दरम्यान, आमचे किमान दोन तृतीयांश म्हणजे आठ आमदार फोडण्यासाठी भाजपचे प्रयत्न होते. आमच्या अनेक लोकांना मोठ्या रकमेची ऑफर देण्यात आली आहे. ऑफर केलेली रक्कम ऐकून मला धक्का बसला आहे. पण आमचे ६ आमदार ठाम राहिले, मला त्यांचा अभिमान आहे. आम्ही आणखी काही आमदारांच्या संपर्कात आहोत आणि ते आमच्यासोबत असतील. आता नवा नेता निवडला जाईल, अशी माहितीही राव यांनी रविवारी दिली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT