पणजी : मागील काही महिन्यांपासून काँग्रेसला एकामागून एक धक्के बसत आहेत. अनेक नेते पक्ष सोडून जात असून सोमवारी (ता. 27) त्यात आणखी एका नेत्याची भर पडणार आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री लुईजिन्हो फेलेरो हे पक्षाला रामराम ठोकणार आहे. ते तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.
फेलेरो हे गोवा काँग्रेसचे दिग्गज नेते मानले जातात. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचे अत्यंत विश्वासू म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यांना काही दिवसांपूर्वीच गोव्यात समन्वय समितीचे अध्यक्ष करण्यात आलं होतं. पण आता त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. त्यांनी आपल्या आमदारकीचाही राजीनामा दिला आहे. त्यामुळे काँग्रेससाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
पुढील वर्षी गोव्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. त्याआधीच काँग्रेसचा दिग्गज नेता पक्ष सोडून जाणार असल्यानं काँग्रेससमोर संकट उभे राहिले आहे. 2017 मध्ये हातातोंडाशी आलेला घास गेला होता. यावेळी पक्षाला गोव्यात सत्ता स्थापन करण्याबाबत अपेक्षा होती. पण दिग्गज नेता सोडचिठ्ठी देणार असल्यानं पक्षाला इतर नेते व कार्यकर्त्यांना एकसंध ठेवण्यासाठी मोठी कसरत करावी लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
फेलेरो हे सोमवारी दुपारी साडेचार वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत. यामध्ये ते काँग्रेसला सोडचिठ्ठी देत तृणमूल काँग्रेसमध्ये जाण्याबाबत अधिकृत घोषणा करू शकतात त्यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना याबाबत संकेत दिले होते. गोवा काँग्रेसमध्ये सर्वकाही ठीक नाही. काही नाराज आमदारही तृणमूलमध्ये जाऊ शकतात, असं सुतोवाच त्यांनी केलं आहे. खूप विचार करून मनाची तयारी केली आहे. भाजपविरोध लढण्यासाठी ममता बॅनर्जी यांच्यासारख्या लढवय्याची गरज असल्याचे ते म्हणाले आहेत.
गोवा सध्या कठीण प्रसंगातून जात आहे. त्यासाठी ममतांसारख्या लढवय्याची गरज आहे. मी एक काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. सर्व काँग्रेस पक्षांनी एकत्र येत पुढील लोकसभा निवडणूक लढवावी, असं मला वाटतं. ममतांची धोरणं, विचारधारा ही काँग्रेसचीच आहे, असं फेलेरो म्हणाले. 71 वर्षांचे फेलेरो 1998-99 यावर्षी मुख्यमंत्री होते. त्यांच्या आमदारकीच्या राजीनाम्यामुळे 40 सदस्यांच्या सभागृहात काँग्रेसचे केवळ पाच आमदार उरले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.