BJP and Congress  Sarkarnama
देश

सत्ताधारी पक्षाच्या कार्यक्रमाला आपला आमदार जाताच विरोधी पक्षनेते 'अॅक्शन मोड'वर

भाजपच्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमाला काँग्रेसच्या आमदाराने हजेरी लावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

सरकारनामा ब्युरो

पणजी : सत्ताधारी पक्षाच्या कार्यक्रमाला विरोधी पक्षाच्या आमदारानं हजेरी लावल्यानं राज्यातील राजकारण तापलं आहे. हा आमदार पक्ष सोडून सत्ताधारी पक्षात जाण्याची चर्चा सुरू झाली आहे. यामुळे विरोधी पक्षाच्या गोटात खळबळ उडाली आहे. यानंतर विरोधी पक्षनेते 'अॅक्शन मोड'वर गेले आहेत. त्यांनी तातडीने या आमदाराला बोलावून त्याच्याशी दोन तास चर्चा केली आहे. या आमदाराला समजही देण्यात आल्याचे समजते.

पणजीतील भाजपच्या (BJP) मुख्यालयात स्थापना दिनाचा हा कार्यक्रम झाला. या वेळी काँग्रेसचे (Congress) आमदार राजेश फळदेसाई (Rajesh Faldessai) हे उपस्थित होते. त्यांना पाहून अनेक भाजप नेत्यांच्या भुवया उंचावल्या. फळदेसाई हे कुंभारजुवे मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यांनी गोव्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंदशेट तानावडे आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासोबत फोटोही काढून घेतले. या तिघांनी एकत्रितपणे छायाचित्रकारांना पोझ दिली. त्यावेळी तिघांमध्ये काही काळ चर्चा झाली. भाजपचे संघटन सचिन सतीश धोंडही उपस्थित होते. यामुळे फळदेसाई हे काँग्रेसला धक्का देऊन भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

फळदेसाई यांनी भाजपच्या स्थापना दिनाला हजेरी लावल्यानंतर काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे. यानंतर विरोधी पक्षनेते मायकेल लोबो यांनी तातडीने पावले उचलली आहेत. त्यांनी ताबडतोब फळदेसाई यांना बोलावून घेतलं. फळदेसाई यांच्यासोबत त्यांनी सुमारे दोन तास चर्चा केली. फळदेसाई हे राजकारणात नवीन असले तरी पक्षशिस्त महत्वाची असल्याचे लोबोंनी त्यांना सांगितले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, काँग्रेसचे गोवा प्रभारी दिनेश गुंडुराव हे 10 एप्रिलला गोव्यात दाखल होत आहेत. ते काँग्रेसच्या सर्व आमदारांशी चर्चा करणार आहेत.

भाजपच्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमाला महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे (MGP) अध्यक्ष पांडुरंग ढवळीकर, मगोपचे आमदार जीत अरोळकर हेसुद्धा उपस्थित होते. भाजपला पाठिंबा देणारे अपक्ष आमदार अलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनीही हजेरी लावली होती. मगोपला मंत्रिपद मिळणार का, यावर बोलताना ढवळीकर म्हणाले की, आम्ही भाजपला विनाशर्त पाठिंबा दिला आहे. त्यांनी आम्हाला विनंती केली आणि आम्ही पाठिंबा दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT