पणजी : गोव्यातील प्रचार (Goa Legislative Assembly)अंतिम टप्प्यात आला आहे. नेत्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी आज भाजप नेत्यांवर तोफ डागली. ''घराणेशाहीचा ढोल भाजप कधीपर्यंत बडवत राहणार? '' असा सवाल मलिक (Nawab Malik)यांनी उपस्थित केला आहे. प्रदेश प्रवक्ते व स्टार प्रचारक क्लाईड क्रास्टो, प्रदेश सरचिटणीस अनिल झोलापुरे आणि प्रदेश प्रवक्ते अविनाश भोसले उपस्थित होते.
मलिक म्हणाले, ''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत बोलताना आम्ही घराणेशाहीच्या विरोधात असल्याचे म्हटले. पण दुसरीकडे उत्तर प्रदेशमध्ये ५६ अशा उमेदवारांना तिकीट दिले आहे, ज्यांचे सगेसोयरे राजकारणात आहेत. तुम्हाला घराणेशाहीचे वावडे आहे तर मग गोव्यामध्ये दोन पती-पत्नीच्या जोड्या निवडणूक कशा काय लढवू शकतात? बाबूश आणि त्यांची पत्नी तसे राणे पती-पत्नी निवडणूक लढवत आहेत. मग घराणेशाहीचा ढोल भाजप कधीपर्यंत बडवत राहणार,''
भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गोवा निवडणुकीची जबाबदारी दिली आहे. ते परिवारवादाचीच उपज नाहीत काय? असा सवाल देखील मलिक यांनी उपस्थित केला. केंद्रातील मंत्र्यांची यादी तपासून पाहा, अनेक मंत्र्यांची घराणेशाही दिसेल. उत्तर प्रदेशमध्ये मंत्र्यांच्या नातलगांना तिकीट देण्यात आले आहेत. मग गोव्यातच तुम्ही परिवारवादाचा मुद्दा कशाला काढता? असा सवाल मलिक यांनी केला.
''राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वाखाली आम्ही गोव्याची निवडणूक लढवत आहोत. त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा लवकरच जाहीर केला जाईल. गोव्याच्या जनतेने २०१७ च्या निवडणुकीत भाजपला नाकारले होते. काँग्रेसच्या पारड्यात बहुमत होते. त्यानंतर सत्ता मिळाल्यानंतरही भाजपने गोव्यातील जनतेला न्याय दिला नाही,'' अशी टीका नवाब मलिक यांनी केली.
सत्ता राबवत असताना भाजपने चुकीची धोरणे राबविल्यामुळे गोव्यातील पर्यटन कमी झाले आहे. त्यामुळे बेरोजगारीत वाढ झाल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या माध्यमातून सत्तेत आल्यास नवे पर्यटन धोरण राबविण्यात येईल, जेणेकरुन रोजगार वाढतील, असे आश्वासन त्यांनी दिले. ''नैसर्गिक साधनसंपत्तीवर गोव्याचा पहिला हक्क आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर होत असताना निसर्गाला धक्का पोहोचणार नाही, याकडेही आम्ही लक्ष देऊ,'' असेही ते म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.