शिवसेनेत माझी 'लेव्हल' दानवेंपेक्षा वरचढ ; खैरेंनी डिवचलं

''राज्यातील 13 शिवसेना नेत्यांपैकी मी एक प्रमुख नेता आहे,'' असे सांगत खैरे यांनी दानवे यांची लेव्हल अजूनही आपल्यापेक्षा कमीच असल्याचा टोला हाणला आहे.
Ambadas Danve,Chandrakant Khaire
Ambadas Danve,Chandrakant Khairesarkarnama

औरंगाबाद : मागील काही दिवसांपासून औरंगाबादच्या शिवसेनेत (shivsena)पुन्हा गटबाजीला उधाण आले आहे. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire)आणि जिल्हाप्रमुख अंबादास दानवे (Ambadas Danve)यांच्यात प्रमुख गटबाजी पाहायला मिळते. खैरै अन् दानवे यांचा वाद जगजाहीर आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये पहिल्यापासून वर्चस्वाची लढाई होत असल्याचे आपण पाहिले आहे.

दोन्ही नेते एकमेंकावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. खैरे यांनी पुन्हा एकदा दानवे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ''माझी आणि अंबादास दानवे यांची लेव्हल एक नाही. राज्यातील 13 शिवसेना नेत्यांपैकी मी एक प्रमुख नेता आहे,'' असे सांगत खैरे यांनी दानवे यांची लेव्हल अजूनही आपल्यापेक्षा कमीच असल्याचा टोला हाणला आहे.

जिल्हाप्रमुख बदलणार का?

मागील अनेक वर्षांपासून औरंगाबादच्या जिल्हाप्रमुख पदावर आमदार अंबादास दानवे हेच विराजमान आहेत. त्यामुळे आता आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर औरंगाबादचा जिल्हाप्रमुख बदलणार का? या प्रश्‍नावर खैरे म्हणाले की, मराठवाड्यातील सर्व जिल्हाप्रमुख बदलले आहेत. केवळ औरंगाबाद ही मराठवाड्याची राजधानी असल्याने अजून निर्णय घेण्यात आलेला नाही, असे सांगत जिल्हाप्रमुख बदलण्याच्या प्रश्‍नाला खैरे यांनी पूर्णविराम दिला.

Ambadas Danve,Chandrakant Khaire
मलिक, चिंता करु नका, भलेबुरे ओळखण्यास महिला समर्थ ; हिजाबवरुन भाजपचा टोला

तनवाणींना जबाबदारी देणार

माजी आमदार किशनचंद तनवाणी हे शिवसेनेच्या जुन्या फळीतील एक प्रमुख नेते आहेत. मात्र मध्यंतरी गटबाजीमुळे ते भाजपच्या तंबूत जाऊन शहराध्यक्ष पदावर होते. मात्र, पुन्हा त्यांची घरवापसी झाली. शिवसेनेत परतल्यापासून ते अडगळीतच पडलेले आहेत. खैरे म्हणाले, ''तनवाणी यांना पुन्हा सक्रीय केले जाणार आहे. तसे ते सक्रियच आहेत. मात्र त्यांच्यावर जबाबदारी देण्यासाठी प्रमुख पद देण्याचे वरिष्ठांना कळवले आहे. माझ्या मनाप्रमाणे तनवाणींना पद देण्यात यावे, असेही कळवले असल्याचे खैरे यांनी सांगितले.

यामुळेच दोन्ही नेत्यांमध्ये लढाई

काही दिवसांपूर्वीच दानवे यांनी जिल्ह्यात शिवसंवाद अभियान राबवले. त्यावर खैरे यांनी आपले सवर्स्व सिद्ध करण्यासाठी शिवतेज अभियानाला सुरूवात केली. त्यामुळे शिवसेनेतील कार्यकर्ते गोंधळले. दानवेंच्या शिवसंवाद अभियानात जावे तर खैरेंना राग आणि शिवतेज अभियानात जावे तर दानवेंचा रोष यामुळे कार्यकर्ते बुचकळ्यात पडले होते. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेचे प्रमुख नेते तथा खासदार संजय राऊत यांनीच औरंगाबादेतील महागाईविरोधातील मोर्चात खैरेंना पुन्हा संसदेत पाठवण्याची मनिषा व्यक्त केली आहे. त्यामुळे खैरे पुन्हा लोकसभा लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्‍वभूमीवरच खैरे आणि दानवेंत वर्चस्वाची लढाई सुरू झाल्याचे पहावयास मिळते आहे.

मी एक प्रमुख नेता

खैरे यांनी बुधवारी (ता. 9) आयोजित पत्रकार परिषदेत पुन्हा एकदा अंबादास दानवे यांच्यावर निशाणा साधला. त्यांना कमी लेखन्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की, माझी आणि अंबादास दानवे यांची लेव्हल एक नाही. राज्यातील 13 शिवसेना नेत्यांपैकी मी एक प्रमुख नेता आहे. आम्हा प्रमुख नेत्यांनंतर उपनेते, संपर्कप्रमुख आणि शेवटी जिल्हाप्रमुख, असे सांगत खैरे यांनी आपली लेव्हल शिवसेनेत दानवेंपेक्षा वरचढ असल्याचे दाखवून दिले. शिवसेनेत असलेल्या गटतटांवर शिवतेज अभियानातून नांगर फिरवला आहे. आता कोणताही गटतट राहिलेला नाही. सर्व नगरसेवकांनी चांगले काम केले असल्याचे शिवतेज अभियानातून निदर्शनास आल्याचे खैरे यांनी नमूद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com