Panjab Politics : Sarkarnama
देश

Panjab Politics : पंजाबमध्ये राज्य सरकारविरुद्ध राज्यपाल संघर्ष पेटला; राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा इशारा

CM vs Governor Conflict : पंजाबमधील सत्ताधारी भगवंत मान सरकार आणि राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्यात पुन्हा वादाच्या फैरी झडल्या आहेत.

सरकारनामा ब्यूरो

Panjab News : महाराष्ट्राप्रमाणे आता पंजाबमध्येही राज्य सरकार विरूद्ध राज्यपाल असा संघर्ष पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित आणि मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यातील वाद संपण्याचे नाव घेत नाहीये. पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी आप सरकार संविधानाच्या विरोधात काम करत असल्याचा आणि त्यांच्या पत्रांना उत्तर देत नसल्याचा आरोप केला आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्री भगवंत मान यांना पत्र लिहून त्यांच्या पत्रांना उत्तर न दिल्यास राष्ट्रपती राजवटीची शिफारस करू शकतो, असा इशारा दिला आहे.

बनवारीलाल पुरोहित म्हणाले की, राज्यपालांनी मागितलेली माहिती न देणे म्हणजे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर लादलेल्या घटनात्मक कर्तव्याचा अपमान आहे. तसे न केल्यास कायदा आणि संविधानानुसार कारवाई करण्याशिवाय माझ्याकडे पर्याय राहणार नाही. यापूर्वी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी मुख्यमंत्री मान यांच्यावर जूनमध्ये झालेल्या विधानसभेच्या अधिवेशनात त्यांची प्रतिमा मलिन केल्याचा आरोप केला होता.

त्याचवेळी, याआधीही राज्यपाल पुरोहित यांनी भगवंत मान यांच्यावर प्रशासकीय बाबींची माहिती न दिल्याचा आरोप केला होता. विधानसभेच्या अधिवेशनात मंजूर झालेल्या चार विधेयकांपैकी एका विधेयकात विद्यापीठांमधील कुलगुरूंच्या नियुक्तीचे राज्यपालांचे अधिकार काढून घेणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. पुरोहित यांनी ते पूर्णपणे बेकायदेशीर ठरवले. पुरोहित यांनी सीएम मान यांच्यावर संविधानाच्या कलम १६७ चे उल्लंघन केल्याचा आरोप केला.

'कोणत्याही पत्राला पूर्ण उत्तर मिळाले नाही'

इतकेच नव्हे तर, राज्यपालांनी मागितलेली कोणतीही प्रशासकीय माहिती मुख्यमंत्री देण्यास बांधील आहेत. मार्चमध्येही सर्वोच्च न्यायालयाने या घटनात्मक तरतुदींचा आदर करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांना 10-15 पत्रे लिहिली. परंतु त्यापैकी अनेकांना उत्तर मिळाले नाही किंवा अपूर्ण उत्तर मिळाले, असाही पुरोहित यांनी आरोप केला. (Panjab Politics)

मी कोणतीही माहिती विचारली की सीएम मान संतापतात. ते फक्त तीन कोटी पंजाबींना उत्तरदायी आहेत, राजभवनाला नाही. पण, त्याला राज्यघटनेनुसार चालवायचे आहे, त्यांच्या मर्जीनुसार नाही, असे पुरोहितांनी सांगितले.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT