Narendra modi, Amit Shah  sarkarnama
देश

Gujarat Cabinet update : मोदी-शहांचे आमदारांना 'दिवाळी गिफ्ट'; मंत्र्यांचा आकडा 16 वरून थेट 25 वर नेला...

Narendra Modi and Amit Shah Announce Major Gujarat Cabinet Expansion : गुजरातमध्ये 2027 मध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यादृष्टीने भाजपने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. नव्या-जुन्या नेत्यांचा मेळ घालत निवडणुकीला सामोरे जाण्याची रणनीती भाजपने केलेली दिसते.

Rajanand More

Impact of Cabinet Expansion on Gujarat’s Political Landscape : गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार होणार आहे. गुरूवारीच पटेल वगळता मंत्रिमंडळातील सर्व 16 मंत्र्यांनी राजीनामे दिले होते. त्यामुळे नव्या मंत्रिमंडळात कुणाला संधी मिळणार, याबाबतची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुजरातमधील भाजप आमदारांना सुखद धक्का दिला आहे.

मंत्रिमंडळात समावेश होणाऱ्या आमदारांची यादी समोर आली आहे. भाजपने 25 आमदारांना मंत्रिपदाची संधी दिली आहे. मागील मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांसह 17 मंत्री होते. नव्या मंत्रिमंडळामध्ये हा आकडा 26 असणार आहे. यामध्ये काही नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. क्रिकेटपटू रविंद्र जडेजाची आमदार पत्नी रिवाबा यांनाही मंत्रिपदी बढती मिळाली आहे.

काँग्रेसमधील भाजपमध्ये आलेल्या आमदारालाही भाजपने मंत्रिपद दिले आहे. हर्ष संघवी, कनू देसाई, ऋषिकेश पटेल, कुंवरजी बावलिया, पुरूषोत्तम सोलंकी यांच्यासह आणखी काही आमदारांना पुन्हा संधी मिळाली आहे. नव्या मंत्रिमंडळात रिवाबा यांच्यासह तीन महिला मंत्री असतील.

रिवाबा यांनी 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्यांना 2022 मध्ये जामनगर उत्तर मतदारसंघातून विधानसभेची लॉटरी लागली. तब्बल 88 हजारांहून अधिक मते मिळवत रिवाबा यांनी विजय मिळवला. आमदारकीच्या पहिल्या टर्ममध्ये त्यांना मंत्रिपदावरही संधी मिळाली आहे. त्यांना 2027 पर्यंत मंत्रिपदावर राहता येणार आहे.

गुजरातमध्ये 2027 मध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यादृष्टीने भाजपने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. नव्या-जुन्या नेत्यांचा मेळ घालत निवडणुकीला सामोरे जाण्याची रणनीती भाजपने केलेली दिसते. त्यासाठी जातीय समीकरणांचाही विचार करण्यात आला आहे. काही मतदारसंघांमध्ये याबाबत नाराजी होती. ती यावेळी दूर करण्यात आल्याचे दिसते.

नव्या मंत्रिमंडळामध्ये 9 ओबीसी, 7 पाटीदार, 4 एसटी आणि 3 एससी समाजातील आमदारांना संधी देण्यात आली आहे. मागील मंत्रिमंडळात कमी प्रतिनिधित्व मिळालेल्या समाजाला खूष करण्याचा प्रयत्न भाजप नेतृत्वाने केल्याची चर्चा आहे. मागील सरकारमधील मंत्र्यांच्या कामकाजाबाबत नाराजी किंवा अंतर्गत तक्रारीही नव्हत्या. पण भाजप नेतृत्वाकडून पक्षांतर्गत बदल आणि निवडणुकीच्या तयारीच्यादृष्टीने असे फेरबदल यापूर्वी इतर राज्यांमध्येही केले आहेत.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT