Vaishali Yadav Latest News | Russia Ukraine War Latest News
Vaishali Yadav Latest News | Russia Ukraine War Latest News Sarkarnama
देश

वैशालीचे सरपंचपद धोक्यात? घरी परतताच हातात कारवाईची नोटीस

सरकारनामा ब्युरो

लखनौ : सरपंचपदी निवड झाल्यानंतर महिनाभरात युक्रेनमध्ये (Ukraine) शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या वैशाली यादव (Vaishali Yadav) हिचे सरपंचपद धोक्यात आले आहे. रशियाने (Russia) युक्रेनवर हल्ला केल्यानंतर वैशालीने मदतीसाठी व्हिडीओ तयार केला अन् तिथूनच तिच्या अडचणी सुरू झाल्या. व्हिडीओ व्हायरल होताच जिल्हा प्रशासनाने ग्रामपंचायतीच्या (Gram Panchayat) कामाची चौकशी सुरू केली. आता वैशाली मायदेशी परतली असून प्रशासनाने तिला याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. (Russia Ukraine War Latest News)

वैशाली ही उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) अरवल क्षेत्रातील तेरा पुरसौली गावची सरपंच (Sarpanch) आहे. वैशाली युक्रेनमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे. तिचे शिक्षण पूर्ण होण्यासाठी काही महिनेच शिल्लक आहेत. वैशाली 2018 मध्ये एमबीबीएसच्या शिक्षणासाठी युक्रेनला गेली होती. 2021 च्या पंचायत निवडणुकीवेळी वैशाली गावांत आली होती. तिने ही निवडणूक लढवली आणि निवडूनही आली. गावकऱ्यांनी तिला सरपंचही केलं.

सरपंच झाल्यानंतर महिनाभरातच वैशाली पुन्हा युक्रेनला शिक्षण पूर्ण करण्यासाठी गेली आहे. आतापर्यंत ग्रामपंचायतीच्या केवळ एकाच बैठकीला ती उपस्थित राहिली आहे. तसेच ग्रामपंचायतीच्या अन्य कामकाजातही तिचा कसलाही सहभाग नाही. ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहाराचीही जिल्हा प्रशासनाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे. वैशाली गावात नसताना सरपंचाच्या बँक खात्याचा व्यवहार कसा सुरू होता, याबाबत प्रशासनाकडून चौकशी केली जात आहे.

रोमानिया येथून इतर विद्यार्थ्यांसोबत वैशाली शुक्रवारी हिंडन विमानतळावर दाखल झाली. तिथून ती लखनौमधील घरी गेली. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने तिला कारणे दाखवा नोटीस बजावून खुलासा मागवला आहे. हरदोई जिल्ह्याचे पंचायत राज अधिकारी गिरीश चंद्र यांनी वैशाली यादव यांच्यावर कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केलं आहे. वैशाली यादव या ग्राम पंचायतीच्या कामकाजासाठी उपस्थित नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या शिक्षणासाठी युक्रेनला गेल्या आहेत. आम्ही याबाबतचा अहवाल मागवला आहे, त्यानुसार कारवाई केली जाईल, असं गिरीश चंद्र यांनी स्पष्ट केलं आहे.

वैशाली युक्रेनमध्ये असताना तिचे गावातील काम वडील महेंद्र सिंह सांभाळत आहे. ते समाजवादी पक्षाचे नेते आहेत. पण बँक खात्यातील व्यवहारावरून वाद निर्माण झाला आहे. गावासाठी येणारा निधी सरपंचांच्या खात्यात जमा होत असतो. याबाबत आता जिल्हा प्रशासनाकडून चौकशी सुरू करण्यात आल्याने वैशालीच्या अडचणी वाढल्या आहेत. महेंद्र सिंह यांनी मात्र कोणतेही काम नियमाबाहेर केले नसल्याचे म्हटले आहे. ग्रामपंचायतीच्या एका बैठकीत उपस्थित राहून ती युक्रेनला गेली. आता परत आल्यानंतर दुसऱ्या बैठकीला उपस्थित राहील, असं त्यांनी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT