Harivansh Narayan Singh sarkarnama
देश

JDU : अखेर ठरलं ; भाजपची साथ सोडल्यानंतर 'जदयू'ने घेतला आणखी एक मोठा निर्णय

JDU : राज्यसभा उपाध्यक्षपद हे राजकारणाच्या पलीकडे असते त्यामुळे हरिवंश यांनी राजीनामा देण्याची गरज नाही‘, असे जदयू अध्यक्ष राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंह यांनी स्पष्ट केले.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : बिहारमध्ये (Bihar) नव्याने स्थापन झालेल्या महागठबंधन सरकारचा काल (१६ ऑगस्ट) मंत्रीमंडळ विस्तार झाला. एकूण ३१ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. बिहारमध्ये सत्ताबदल झाल्याने पडसाद राज्यसभेच्या उपाध्यक्षपदावर उमटण्याची शक्यता कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे.

जदयू पक्षाचे सर्वेसर्वा असलेले नितीशकुमार या सरकारचे नेतृत्व करत असून उपमुख्यमंत्रीपद राजद पक्षाचे तेजस्वी यादव यांच्याकडे देण्यात आलेले आहे. या सरकारमध्ये सर्वाधिक १६ मंत्रीपदं राजद पक्षाला मिळाली आहेत. नितीश कुमार यांच्या पक्षाच्या वाट्याला ११ मंत्रीपदं आली आहेत. काँग्रेस पक्षाला २ तर हिंदुस्तानी आवाम मोर्चा आणि एका अपक्ष आमदाराला प्रत्येकी १ मंत्रीपद देण्यात आले आहे.

बिहारमध्ये नितीशकुमार यांनी भाजपची साथ सोडून तेजस्वी यादव यांच्या राजदच्या साथीने पुन्हा सरकार स्थापन केले असले तरी त्याचे पडसाद राज्यसभेच्या उपाध्यक्षपदावर उमटण्याची शक्यता कमी आहे. या पदावरील जदयू नेते हरिवंश नारायण सिंह (Harivansh Narayan Singh) यांना तूर्त कायम राहण्यास जदयू नेतृत्वाने हिरवा कंदील दाखविला आहे.

‘राज्यसभा उपाध्यक्षपद हे राजकारणाच्या पलीकडे असते त्यामुळे हरिवंश यांनी राजीनामा देण्याची गरज नाही‘, असे जदयू अध्यक्ष राजीव रंजन सिंह उर्फ ललन सिंह यांनी स्पष्ट केले. यावर नितीशकुमार, खुद्द हरिवंश व महत्वाचे म्हणजे भाजपकडून अद्याप प्रतिक्रिया आलेली नाही. राज्यसभेत जदयू एनडीएबाहेर गेल्याने भाजप आघाडीचे बळ १०९ वर आले आहे.

जदयूने भाजप प्रणित एनडीएतून बाहेर पडणे हा एक राजकीय निर्णय आहे. हरिवंश हे वरिष्ठ सभागृहाचे उपाध्यक्ष आहेत. त्यामुळे त्यांनी या निणर्यावरून राजीनामा देण्याची गरज नाही. दोन्ही निर्णयांचे आपसात काही देणे घेणे नाही, असे सांगून लल्लन सिंह म्हणाले की लोकशाहीत संसदीय किंवा विधिमंडळ सदनाचे पीठासीन अधिकारीपद हे राजकीय परिप्रेक्षाच्या बाहेरचे असते व त्याकडे पक्षातीत दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे असे आमच्या (जदयू) नेतृत्वाचे मत आहे.

राज्यसभेतील एनडीए बाहेरच्या अनेक पक्षांनी उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत कॉंग्रेस उमेदवार बी के हरिप्रसाद यांच्याऐवजी हरिवंश यांना मतदान केले होते. हरिवंश यांचा मुद्दा सभागृहाशी संबंधित असल्याने हरिवंश यांनी राजीनामा देण्याची गरज नाही. ‘आपण नितीशकुमार यांच्यामुळेच सार्वजनिक जीवनात आलो आहोत. महाआघाडीत पुन्हा जाण्यासह त्यांच्या प्रत्येक निर्णयाबरोबर आपण त्यांच्यासह असू', असे हरिवंश यांनी याआधीच स्पष्ट केले आहे,'अशीही पुस्ती लल्लन सिंह यांनी जोडली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT