Rahul Gandhi Sarkarnama
देश

Rahul Gandhi : काँग्रेसला विजयाचा कॉन्फिडन्स, हरियाणामध्ये राहुल गांधींना कसली भीती?

Rajanand More

New Delhi : हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने कंबर कसली असून उमेदवार निवडीसाठी बैठकांचे सत्र सुरू आहे. अशातच पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्या मनात आघाडीची चक्रे फिरू लागल्याचे समजते. पक्षाने राज्यात सर्व 90 जागांवर लढण्याची तयारी केलेली असताना राहुल यांना कसली भीती सतावत आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुलात रंगली आहे.

राहुल गांधी यांनी आम आदमी पक्षासोबत आघाडी करण्याबाबत चाचपणीच्या सुचना राज्यातील नेत्यांना दिल्या आहेत. पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत त्यांनी नेत्यांकडून आघाडीबाबत सुचना मागवल्या आहेत. एका ज्येष्ठ नेत्यावर आघाडीची जबाबदारी सोपवण्यात आल्याचे समजते.

दुसरीकडे हरियाणा काँग्रेसला एकट्याने लढल्यास विजय मिळवण्याचा आत्मविश्वास आहे. पक्षाचे नेते भूपेंद्र सिंह हुडा यांनी एकट्याने लढणार आणि जिंकणार, असे म्हटले आहे. आपनेही आघाडीत चार-पाच जागांवर लढण्यापेक्षा सर्व 90 जागांवर उमेदवार देण्याबाबत सूचक विधान केले आहे. पण आघाडीच्या भूमिकेबाबत राहुल यांची नेमकी भूमिका काय असू शकते, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.

राहुल गांधी यांच्या उपस्थितीत जम्मू आणि काश्मीरमध्येही फारुख अब्दुल्ला यांच्या पक्षासोबत आघाडी करण्यात आली आहे. हरियाणामध्येही त्यांना आघाडी हवी आहे. त्यांचे लक्ष्य राष्ट्रीय राजकारण असल्याचे मानले जात आहे. इंडिया आघाडीतील सर्व मित्रपक्षांमध्ये एकजुट दिसावी, अशी त्यामागची भावना असल्याचे दिसते.

दिल्लीसह गुजरात व काही इतर राज्यांतील निवडणुकांमध्ये आपची भूमिका महत्वाची ठरणार आहे. त्यासाठी राहुल यांच्याकडून आधीपासूनच तयारी केली जात असावी. दिल्लीत आपचे सरकार आहे. तर गुजरातमध्येही आपने मागील निवडणुकीत तसेच पंचायत निवडणुकीत चुणूक दाखवली आहे. राहुल यांनी काँग्रेस गुजरातमध्ये भाजपचा पराभव करणार असल्याचे विधान संसदेत केले होते. त्यामागे ही रणनीती असावी, अशीही चर्चा आहे.

हरियाणामध्ये भाजपविरोधी लाट असल्याचे सध्याचे चित्र आहे. शेतकरीवर्गामध्ये नाराजी आहे. त्यामुळे यावेळी स्थिती अनुकूल असल्याचे काँग्रेसच्या नेत्यांना वाटत आहे. पण आप आणि काँग्रेसने स्वतंत्रपणे निवडणूक लढवल्यास भाजपविरोधी मतांचे विभाजन होईल. त्याच सरळ फायदा भाजपला होणार आहे. त्यामुळे राज्यात सत्ता मिळवण्याच्या काँग्रेसच्या स्वप्नांना सुरुंग लागू शकतो, अशीही भीती नेत्यांना आहे. त्यामुळे आता राहुल गांधी आघाडी करण्यात कितपत यशस्वी ठरणार, हे लवकरच समजेल.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT