Kumari Selja Sarkarnama
देश

Kumari Selja : प्रचारातून गायब, काँग्रेसचे धाबे दणाणले; भाजप प्रवेशाबाबत कुमारी शैलजा यांचे पहिल्यांदाच मोठं विधान

BJP Congress Haryana Assembly Election 2024 : भाजप प्रवेशाच्या ऑफरवर कुमारी शैलजा यांनी पहिल्यांदाच उघडपणे भाष्य केले आहे.  

Rajanand More

New Delhi : हरियाणातील काँग्रेसचे नेत्या व खासदार कुमारी शैलजा नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत त्यांनी प्रचारातून अंग काढून घेतले आहे. भाजपच्या माजी मुख्यमंत्र्यांनी तर त्यांना ऑफरही दिली आहे. त्यामुळे काँग्रेसचेही धाबे दणाणले आहेत. 

कुमारी शैलजा या हरियाणातील काँग्रेसचा दलित चेहरा म्हणून ओळखल्या जातात. पण जागावाटपावरून त्या नाराज आहेत. माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुडा आणि त्यांच्यामध्ये संघर्ष सुरू आहे. त्यामुळे त्या काँग्रेस सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. याबाबत शैलजा यांनी सोमवारी पहिल्यांदाच आपली भूमिका स्पष्ट केली.

एका हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना कुमारी शैलजा यांनी भाजपमध्ये जाण्याबाबतचे वृत्त फेटाळून लावले. त्या म्हणाल्या, असा विचारही मी करू शकत नाही. माझ्या रक्तात काँग्रेस आहे. मी आधीही म्हणाले होते, माझे वडील काँग्रेसच्या तिरंग्यात लपेटून गेले, तशीच मीही तिरंग्यात लपेटून जाणार. माझी माझा पक्ष, विचारधारा आणि नेतृत्वाप्रती कमिटमेंट आहे. माझ्याविषयी भ्रम पसरवले जात आहेत.

काँग्रेसमध्ये मान-सन्मान होतो. पण काही गोष्टी असतात, त्यासाठी संघर्ष करावा लागतो. यामध्ये पुढे जात आपला रस्ता शोधावा लागतो. पक्षात नाराज होणे, हा आमचा हक्क आहे. मी हताश, निराश नाही. मी अशी स्थिती अनेकदा पाहिली आहे, असे सांगताना शैलजा यांची नाराज लपून राहिली नाही.

भाजपवर टीका करताना शैलजा म्हणाल्या, भाजपकडे दुसरे बोलण्यासाठी काहीही नाही. काँग्रेसला आणि माझ्या नेतृत्वालाही हे माहिती आहे की, मी कधीही काँग्रेस सोडू शकत नाही. भाजपला सध्या उतरती कळा लागली आहे. हरियाणामध्ये काँग्रेसची सत्ता येणार, हे स्पष्ट आहे. मागील दहा वर्षांत केलेल्या कामावर ते बोलू शकत नाही. आता दुसऱ्या पक्षांतील मुद्दे काढून बोलत आहेत.

मुख्यमंत्रिपदासाठी इच्छूक

काँग्रेसकडे एक दलित महिला मुख्यमंत्री म्हणून तुमचे नाव पुढे करण्याची सोनेरी संधी होती. ही संधी पक्षाने दवडल्याबाबत शैलजा यांना विचारले असता त्यांनी सोनेरी संधी होती नव्हे आहे, असे उत्तर दिले. काळाचे चक्र फिरत असते, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्रिपदावरील आपला दावा सोडला नाही. मुख्यमंत्री कोण होणार, हे माहिती नाही. हा निर्णय हायकमांडचा असतो. निवडणुकीनंतर राजकीय परिस्थिती पाहून याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही शैलजा यांनी स्पष्ट केले.     

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT