Haryana Election Result Sarkarnama
देश

Haryana Election Results : भाजपची जोरदार मुसंडी; लाडू-जिलेबी वाटणाऱ्या काँग्रेसला धक्का

Assembly Election 2024 Results Congress BJP : सुरूवातीच्या कलांमध्ये काँग्रेसला बहुमत मिळताना दिसत होते. त्यामुळे कार्यकर्त्यांनी जल्लोष करायला सुरूवात केली होती.

Rajanand More

Chandigarh : हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या निकालात सुरूवातीला काँग्रेसच्या बाजूने दिसत असलेले कल आता फिरले आहेत. भाजपने जोरदार मुसंडी मारत बहुमताचा आकडा पार केला आहे. तर सकाळी लाडू-जिलेबी वाटणाऱ्या काँगेसला मोठा धक्का बसताना दिसत आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, सकाळी 11 वाजेपर्यंत भाजपला 90 पैकी 49 जागांवर आघाडी होती. तर काँग्रेसचे 35 उमेदवार आघाडीवर होते. मागील निवडणुकीपेक्षा भाजपची कामगिरी यावेळी सुधारल्याचे दिसत आहे. हेच कल कायम राहिल्यास भाजप राज्यात विक्रमी विजय मिळवेल. भाजपच्या विजयाची हॅटट्रिक होईल.

'एक्झिट पोल'ने काँग्रेसला बहुमत मिळेल असा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार सुरूवातीचे कल काँग्रेसच्या बाजूने दिसत होते. जवळपास 50 हून अधिक जागांवर काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर होते. पण मतमोजणीच्या फेऱ्या वाढत गेल्यानंतर चित्र बदलत गेले. भाजपने जोरदार मुसंडी मारत काँग्रेसला मागे टाकले आहे.

सकाळी निवडणुकीचे कल हाती येऊ लागल्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी लाडू-जिलेबी वाटण्यास सुरूवात केली होती. काँग्रेसचे 60 हून अधिक आमदार निवडून येतील, असाही दावा केला जात होता. तर भाजपकडून 11 वाजेपर्यंत वाट पाहा, असे सांगितले जात होते. भाजपला जी आशा होती, ती खरी ठरताना दिसत आहे.

भाजपला 49 जागांवर आघाडी असली तरी जवळपास 10 उमेदवारांना केवळ 500 ते 2 हजार मतांची आघाडी आहे. अद्यापही अनेक मतदारसंघात मतमोजणीच्या जवळपास 12 ते 15 फेऱ्यांची मतमोजणी होणे बाकी आहे. त्यामुळे पुढील एक-दोन तासांत आकड्यांमध्ये आणखी बदल होईल, असा दावा दोन्ही पक्षांतील नेत्यांकडून केला जात आहे.  

विनेश फोगाट पिछाडीवर

हरियाणामध्ये प्रतिष्ठेच्या बनलेल्या जुलाना विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार विनेश फोगाट पिछाडीवर आहेत. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 100 ग्रॅम वजन अधिक भरल्याने त्यांना अपात्र ठरवण्यात आले होते. त्यानंतर कुस्तीतून निवृत्ती घेत फोगाट राजकारणात आल्या. काँग्रेसने त्यांना तिकीट देत सहानुभूतीचा फायदा मिळवण्याचा प्रयत्न केला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT