Arvind Kejriwal Sarkarnama
देश

Arvind Kejriwal : हरियाणात मतदानाआधीच केजरीवालांनी गाशा गुंडाळला; जाहीर सभेत केलं मान्य...

Haryana Assembly Election AAP : हरियाणामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी आपने अनेक जागांवर उमेदवार उभे केले आहेत.

Rajanand More

Chandigarh : हरियाणा विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहचला आहे. काही दिवसांपूर्वीच जेलमधून जामीनावर सुटका झालेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालही प्रचारात सक्रीय झाले आहेत. मात्र, मतदानाआधीच त्यांनी राज्यात सत्ता आणण्याची आशा सोडून दिली आहे.

दिल्ली मद्य धोरण घोटाळाप्रकरणी केजरीवाल जवळपास सहा महिने तुरूंगात होते. जामीनावर बाहेर आल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता ते हरियाणात प्रचाराला उतरले आहेत. बुधवारी हिसार येथे झालेल्या एका जाहीर सभेत त्यांनी राज्यात आपची सत्ता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

आप ठरणार किंगमेकर

आपचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल सभेत बोलताना म्हणाले, मला जेलमधून लवकर सोडले असते तर राज्यात आपची सत्ता आली असती. असे असले तरी राज्यात कोणातीही सत्ता आली तरी आपल्याशिवाय सरकार बनणार नाही. त्या सरकारकडून आपली सर्व कामे करून घेण्याची जबाबदारी माझी आहे, असे सांगत केजरीवालांनी राज्यात आप किंगमेकरची भूमिका बजावणार असल्याचे सूचक विधान केले.

एखाद्या नव्या पक्षाने वर्षभरात सत्ता मिळवल्याचा इतिहास केवळ देशच नव्हे तर जगात घडला आहे. दिल्लीत दुसऱ्या निवडणुकीत दिल्लीकरांनी 70 पैकी 67 जागांवर विजय मिळवून दिला. मला विश्वास बसला नव्हता. भाजपला तीन आणि काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही. मी प्रामाणिकपणे काम केले. माजे बँक खाते रिकामे आहे. ठरवले असते तर करोडो रुपये कमावले असते, असेही केजरीवाल म्हणाले.

दरम्यान, राज्यात भाजप आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर आहे. दोन्ही पक्षांकडून आपलीच सत्ता येणार असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, भाजपसमोर यावेळी काँगेसने आव्हान उभे केल्याचे मानले जात आहे. शेतकरी आंदोलन, कृषी कायदे, कुस्तीपटूंचे आंदोलन, हमी भाव असे मुद्दे निवडणुकीत गाजत आहे. त्याचा फटका भाजपला बसेल, असा अंदाज राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त केला जात आहे.

भाजपची मदार आपवर

आपचे उमेदवार किती मते घेणार, यावर भाजपची मदार अवलंबून असल्याचेही बोलले जात आहे. आपला मिळणारी मते काँग्रेसची असतील. त्याचा थेट फायदा भाजपला होईल, अशी गणिते मांडली जात आहे. पण काँग्रेसने राज्यात आपची स्थिती दयनीय असल्याचे सांगत पक्षाचे काहीही नुकसान होणार नाही, असा दावा केला आहे.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT