Nayab Singh Saini Sarkarnama
देश

Nayab Singh Saini News : हरियाणाला मिळणार नवे मुख्यमंत्री; आधी आमदार, खासदार अन् आता CM...

Manohar Lal Khattar News : मनोहरलाल खट्टर यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपकडून सैनी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

Rajanand More

Haryana News : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हरियाणामध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. मनोहरलाल खट्टर यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्याला नवीन मुख्यमंत्री मिळणार आहेत. भाजपने खासदार नायब सिंग सैनी (Nayab Singh Saini News ) यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ टाकण्याचा निर्णय घेतला आहे. सैनी यांच्यासह इतर मंत्र्यांचा शपथविधीही आज सायंकाळी पाच वाजता होणार आहे.

हरियाणामध्ये (Haryana) भाजप आणि जननायक जनता पार्टीच्या आघाडीचे सरकार होते. पण लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) जागावाटपावरून दोन्ही पक्षांनी आघाडी तोडली. त्यानंतर खट्टर (Manohar Lal Khattar) यांनी सकाळी राज्यपालांकडे आपल्या पदाचा राजीनामा सोपवला. जेजेपीचे दहा आमदार सरकारमधून बाहेर पडले. मात्र, पक्षाला सात अपक्ष आमदारांचा पाठिंबा असल्याने सरकार तरले आहे.

खट्टर यांच्या राजीनाम्यानंतर आज आमदारांच्या बैठकीत सैनी यांच्या नावावर शिक्कामोर्तब कऱण्यात आले. सैनी हे सध्या कुरुक्षेत्र लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत. 2019 मधील निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे उमेदवार निर्मल सिंह यांचा तब्बल 3 लाख 84 हजार मतांनी पराभव केला होता. 2014 मध्ये त्यांनी पहिल्यांदाच आमदारकीची निवडणूक लढवली होती. त्यानंतर ते हरियाणा सरकारमध्ये मंत्रीही झाले. भाजपमध्ये अनेक महत्त्वाची पदे त्यांनी भूषवली आहेत.

खट्टर लोकसभा लढवणार?

मनोहरलाल खट्टर यांच्या राजीनाम्यामुळे ते लोकसभेच्या रिंगणात उतरणार, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. भाजपने दुष्यंत चौटाला यांच्याशी असलेली युती तोडल्याने राज्यात लोकसभा निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर खट्टर यांच्यासह बड्या नेत्यांना मैदानात उतरवले जाऊ शकते.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT