Election Result Share Market Sarkarnama
देश

Share Market : लोकसभा निवडणुकीनंतर शेअर बाजारात भूकंप; विधानसभेच्या निकालानंतर काय होणार?

Lok Sabha Election Haryana Jammu and Kashmir Assembly Election Result : हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये भाजपची सत्ता येणार नाही, असे अंदाज एक्झिट पोलध्ये वर्तवण्यात आले आहेत.  

Rajanand More

New Delhi : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजारात भूकंप आला होता. अनपेक्षित निकालानंतर बाजार कोसळल्याने गुंतवणुकदारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. या निवडणुकीनंतर आता हरियाणा व जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे वेध लागले आहेत. दोन्ही राज्यांत भाजपची सत्ता येणार नसल्याचे संकेत एक्झिट पोलने दिले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा शेअर बाजारावर विपरित परिणाम होणार का, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, हरियाणामध्ये सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्यात भाजपला अपयश येईल. तर काँग्रेस पुन्हा दहा वर्षानंतर सत्ता मिळवेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये भाजप बहुमतापासून दूर राहण्याची शक्यता आहे. केंद्रात सत्ता असलेल्या पक्षाचीच राज्यांमध्येही सत्ता आल्यास त्याचे सकारात्मक परिणाम शेअर बाजारात पाहायला मिळतात. पण फासे उलटे पडले तर बाजार रंग दाखवायला सुरूवात करतो. लोकसभा निकालानंतर गुंतवणूकदारांनी त्याचा अनुभव घेतला आहे.

शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये भाजपची सत्ता आली नाही तरी त्याचा फारसा परिणाम बाजारावर होणार नाही. कारण ही दोन्ही राज्ये तुलनेने लहान आहेत. पण नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्र तर फेब्रुवारी महिन्यात दिल्ली विधानसभेच्या निवडणुका आहेत. या निवडणुकींच्या निकालाचा मात्र बाजारावर काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो, अशी शक्यता विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.  

त्याचप्रमाणे पश्चिम आशियाई देशांमधील सध्याची युध्दजन्य स्थिती आणि त्याचा इंधनाच्या किंमतींवर होणार परिणाम, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची निवडणूक, कंपन्यांचा ताळेबंद आदी मुद्दे गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारे आहेत. इक्वोनॉमिक्स रिसर्चचे संस्थापक जी. चोक्कलिंगम यांनी बिझनेस स्टँडर्डशी बोलताना सांगितले की, लोकसभेच्या जागांचा विचार केल्यास इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्र मोठे राज्य आहे. त्यामुळे इतर राज्यांच्या निकालाचा बाजारावर फारसा परिणाम होणार नाही. पश्चिम आशियाई देशांतील स्थितीचा क्रुड ऑईलच्या किंमतीवर किती परिमाण होतोय, त्यानुसार स्थानिक बाजारात उलथापालथ होऊ शकते.

राज्यातील निवडणुकांच्या निकालाची किंमत बाजाराला मोजावी लागते. त्यामध्ये महाराष्ट्राचा निकाल महत्वाचा असेल, असे शेअर बाजाराचे विश्लेषक अंबरीश बालिगा म्हणाले. बाजाराला चिंता करण्यासारख्या इतर अनेक गोष्टी आहेत. रिझर्व्ह बँकचे धोरण, कंपनांचा ताळेबंद, पश्चिम आशियाई देशांतील स्थितीमुळे बाजार अस्थिर राहू शकतो.

दरम्यान, मागील काही महिन्यांत शेअऱ बाजाराने विक्रमी उसळी घेतली आहे. मुंबई शेअर बाजाराने 85 हजाराचा विक्रमी टप्पा ओलांडला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर कोसळलेला बाजार तितक्याच वेगाने सावरला आणि नवीन विक्रम केला. त्यामुळे विधानसभा निवडणुकांच्या निकालाचा परिणाम फारसा जाणवणार नाही, अशी स्थिती आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT