New Delhi : जम्मू आणि काश्मीरमध्ये 90 जागांसाठी मतदान पार पडल्यानंतर आता एक्झिट पोलचीच चर्चा सुरू आहे. या पोलमध्ये राज्यात त्रिशंकू स्थिती राहणार असल्याचे अंदाज वर्तवण्यात आले आहेत. त्यामध्ये काँग्रेस-नॅशनल कॉन्फरन्सला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. तर भाजप दुसऱ्या क्रमांकावर राहील. माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती किंगमेकर ठरू शकतात.
राज्यात त्रिशंकू स्थिती राहिल्यास भाजपसह काँग्रेस आघाडीला मेहबूबा मुफ्ती यांच्या पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी या पक्षासह अपक्षांची मदत घ्यावी लागणार आहे. अर्थात पीडीपीला किती जागा मिळणार यावर सगळे गणित अवलंबून असेल.
राज्यात पीडीपी किंगमेकर ठरणार असेल तर हा पक्ष कुणाला सहकार्य करणार याबाबत तर्कवितर्क लढवले जात असताना या पक्षाचे नेते झुहैब युसूफ मीर यांनी काँग्रेस आघाडीच्या पारड्यात मत टाकले आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही काँग्रेस आघाडीसोबत जाऊ, असे संकेत त्यांनी दिले आहेत. त्यामुळे भाजपचे सत्तेत येण्याचे स्वप्न धुळीस मिळू शकते.
पीडीपीच्या या भूमिकेवर नॅशनल काँन्फरन्सचे प्रमुख व माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांनी आनंद व्यक्त केला आहे. ते म्हणाले, पीडीपीचे अभिनंदन करायला हवे. त्यांची विचारसरणी आणि आम्ही एकाच मार्गावर आहोत. जम्मू-काश्मीरला एकत्र ठेवायचे आहे, राज्यातील द्वेष संपवायचा आहे.
मेहबूबा मुफ्ती यांचा पक्षातील नेते आणि अब्दुल्ला हे आघाडी करण्यास तयार असल्याने राज्यात दहा वर्षानंतर नवे समीकरण पाहायला मिळू शकते. 2014 मध्ये पीडीपीने भाजपसोबत जात सत्ता स्थापन केली होती. पण या सरकारचा कार्यकाळ पूर्ण होण्याआधीच भाजपने सत्तेतून काढता पाय घेतला होता. त्यामुळे मेहबूबा मुफ्ती पुन्हा भाजपसोबत जाणार नाही, याबाबत सुरूवातीपासूनच अंदाज व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, एक्झिट पोलमध्ये काँग्रेस आघाडीला जवळपास 40 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर पीडीपीला 6 ते 12 जागा मिळू शकतात. राज्यात सत्तेसाठी 46 जागांची गरज आहे. राज्यपाल नियुक्त पाच आमदारही यामध्ये जोडल्यास बहुमताचा आकडा 48 होतो. त्यामुळे आघाडीला सत्ता स्थापन करण्यासाठी 48 आमदार लागतील. एक्झिट पोलमध्ये कोणताही पक्ष तिथपर्यंत पोहचताना दिसत नाही. भाजपला 30 च्या जवळपास जागा मिळू शकतात, असे एक्झिट पोलच्या आकड्यांवरून दिसते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.