Bhole Baba Sarkarnama
देश

Hathras Stampede : भोलेबाबा सोडून सगळे जबाबदार; SDM, तहसिलदार, दोन पोलिसांसह सहा जण निलंबित

Bhole Baba Satsang Stampede Uttar Pradesh Government : भोलेबाबाच्या सत्संगामध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या चौकशीसाठी सरकारने विशेष तपास पथकाचे नेमणूक केली होती.  

Rajanand More

Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात भोलेबाबाच्या सत्संगामध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी विशेष तपास पथकाने त्यांना क्लीन चिट दिली आहे. अपेक्षेपेक्षा जास्त जमलेली गर्दी आणि नियोजनाच्या अभावामुळे ही घटना घडल्याचे एसआयटीने आपल्या अहवालात स्पष्ट केले आहे.

एसआयटीच्या अहवालानंतर उत्तर प्रदेश सरकारने मंगळवारी सहा सरकारी अधिकाऱ्यांना निलंबित केले. त्यामध्ये उपविभागीय दंडाधिकारी, तहसिलदार, सर्कल अधिकारी आणि तीन पोलिसांचा समावेश आहे. कामात कुचराई केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

हाथरस येथे झालेल्या चेंगराचेंगरीत तब्बल 121 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीने भोलेबाबा यांच्यावर काहीच ठपका ठेवलेला नाही. तसेच पोलिसांनीही आतापर्यंत भोलेबाबवर गुन्हा दाखल केलेला नाही.

सत्संगाच्या आयोजकांवर गुन्हा दाखल झाला आहे. एसआयटीने प्रत्यक्षदर्शी व इतर काही पुराव्यांच्याआधारे आयोजक आणि स्थानिक पोलिस व प्रशासकीय अधिकाऱ्यांना दोषी धरले आहे.

एसआयटीने 128 जणांचे जबाब घेतले आहेत. या घटनेची न्यायालयीन आयोगाकडूनही चौकशी केली जात आहे. त्यामध्ये निवृत्त न्यायाधीशांसह तिघांचा समावेश आहे. आयोगाकडून दोन महिन्यांत अहवाल सादर केला जाणार आहे. त्यामुळे अत्यंत बारकाईने सर्व बाबींचा तपास केला जाणार आहे.

भोलेबाबा अजूनही फरार

सत्संगामध्ये मोठी दुर्घटना घडूनही भोलेबाबा अजूनही फरार आहे. तो पोलिसांसमोर आलेला नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पोलिसांकडून त्याचे सर्व आश्रम पालथे घालण्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यानंतरही तो सापडत नसल्याने भोलेबाबा राज्याबाहेर गेल्याचीही चर्चा आहे.

दरम्यान, भोलेबाबाच्या वकिलांनी वेगळाच संशय व्यक्त केला आहे. काही जण सत्संगामध्ये विषारी स्प्रे घेऊन आल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे आयोगाकडूनही सर्व अंगाने तपास केला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT