Jai Ram Thakur and Narendra Modi Sarkarnama
देश

बालेकिल्ल्यातच पराभव अन् भाजपचे मुख्यमंत्री म्हणाले, ही तर महागाईची कमाल!

हिमाचल प्रदेशात सत्ताधारी भाजपला मोठा धक्का बसला आहे. या पराभवाचे खापर मुख्यमंत्र्यांनी महागाईवर फोडले आहे.

सरकारनामा ब्युरो

शिमला : हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh) सत्ताधारी भाजपला (BJP) मोठा धक्का बसला आहे. राज्यातील मंडी लोकसभा मतदारसंघ (Mandi Loksabha) आता काँग्रेसने (Congress) भाजपच्या ताब्यातून हिसकावून घेतला आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री जयराम ठाकूर (Jai Ram Thakur) हे मंडी जिल्ह्यातीलच आहेत. याचबरोबर राज्यातील तीन विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकांपैकी काँग्रेसने विजय मिळवला आहे. या पराभवाचे खापर मुख्यमंत्री ठाकूर यांनी महागाईवर फोडले आहे.

पुढील वर्षी राज्यात विधानसभा निवडणूक होत असून, त्याआधी भाजपला जनतेने दणका दिला आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री ठाकूर म्हणाले की, काँग्रेसने महागाईच्या अस्त्रासारखा वापर केला. पोटनिवडणुकांत हाच मुद्दा होता. महागाई हाच जागतिक मुद्दा असून, स्थानिक नाही. या सर्व गोष्टींमुळे आमचा पराभव झाला. आम्ही जनतेने दिलेला कौल मान्य करतो. आमच्या अपेक्षेप्रमाणे निकाल लागले नाहीत. मंडी लोकसभा मतदारसंघात अतिशय कमी मतांनी आमचा पराभव झाला आहे.

मंडी लोकसभा मतदारसंघातील पोटनिवणुकीत काँग्रेसच्या प्रतिभा सिंह (Pratibha Singh) या विजयी झाल्या. त्यांनी भाजपचे उमेदवार व कारगिल युध्दात सहभागी झालेले ब्रिगेडियर (निवृत्त) खुशाल ठाकूर (Khushal Thakur) यांना पराभूत केले. प्रतिभा सिंह यांनी ठाकूर यांचा 8 हजार 766 मतांनी पराभव केला. हा भाजपसह मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का मानला जात आहे. कारण मागील निवडणुकीत मंडीतून भाजपचे उमेदवार राम स्वरूप हे तब्बल 3.98 लाखांच्या मताधिक्याने निवडून आले होते. स्वरूप यांच्या निधनाने ही जागा रिक्त झाली होती.

मंडी लोकसभा जागेबरोबरच हिमाचल प्रदेशातील तीन विधानसभा जागांसाठी पोटनिवडणूक झाली होती. जुब्बल-कोथकाई, फतेहपूर आणि अर्की या तिन्ही ठिकाणी काँग्रेसने विजय मिळवला. राज्यात पुढील वर्षी विधानसभा निवडणूक होत आहे. त्याआधी झालेल्या या पोटनिवडणुका म्हणजे विधानसभेची रंगीत तालीम मानल्या जात होत्या. या निवडणुकांतील पराभवामुळे मुख्यमंत्री ठाकूर यांची मात्र, डोकेदुखी वाढली आहे. भाजपमधील नाराजांनी त्यांच्या विरोधात आघाडी उघडण्यास सुरवात केली आहे.

निवडणूक आयोगाने 3 लोकसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुका जाहीर केल्या होत्या. त्यामध्ये मध्य प्रदेशातील खांडवा, हिमाचल प्रदेशातील मंडी आणि दादरा नगर हवेली मतदारसंघांची पोटनिवडणूक 30 ऑक्टोबरला झाली होती. आसाममधल्या 5, पश्चिम बंगालमधल्या 4, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि मेघालयातील प्रत्येकी 3, राजस्थान, बिहार आणि कर्नाटकातील प्रत्येकी 3 विधानसभा मतदारसंघांतही पोटनिवडणुका झाल्या होत्या. आंध्र प्रदेश, हरयाना, महाराष्ट्र, मिझोरम, नागालँड आणि तेलंगणमधील प्रत्येकी एका विधानसभा मतदारसंघातही याच दिवशी पोटनिवडणुका झाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT