Vikramaditya Singh, Pratibha Singh Sarkarnama
देश

Congress News : पिक्चर अभी बाकी है! माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी-मुलाने पुन्हा वाढवलं काँग्रेसचं टेन्शन

Rajanand More

Himachal Pradesh News : हिमाचल प्रदेश काँग्रेसवरील संकट तात्पुरते टळले असले तरी पुढील काळात पुन्हा मोठी राजकीय उलथापालथ होऊ शकते, अशी चिन्हे आहेत. काल काँग्रेसच्या नेत्यांनी पक्षात ‘ऑल इज वेल’ असल्याचे सांगतिले असले तरी ‘पिक्चर अभी बाकी है’ अशी चर्चा सुरू झाली आहे. त्याला कारणीभूत ठरल्या आहेत काँग्रेसच्या (Congress News) प्रदेशाध्यक्ष प्रतिभा सिंह आणि त्यांचे पुत्र विक्रमादित्य सिंह.

माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह (Virbhadra Singh) यांच्या निधनानंतर प्रतिभा सिंह आणि विक्रमादित्य यांचा काँग्रेसमध्ये स्वतंत्र गट झाल्याचे चित्र आहे. मागील वर्षभरात मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू आणि त्यांच्यात सख्य नसल्याचे जाणवत होते. राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Election) ही नाराजी बाहेर आली आणि काँग्रेसवर नामुष्की ओढवली. सरकारवरही संकटाचे ढग घोंघावत होते.

काँग्रेसच्या सहा आमदारांनी बंड करत राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपला (BJP) मतदान केले. त्यांची आमदारकी रद्द केल्यानंतर प्रतिभा सिंह यांच्यासह विक्रमादित्य यांनी सावध भूमिका घेतली आहे. पक्षात सर्वकाही आलबेल असल्याचा दावा काल नेत्यांनी केल्यानंतर काही तासांतच विक्रमादित्य (Vikramaditya Singh) यांनी रात्री बंडखोर आमदारांची भेट घेतल्याचे सांगितले जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आज प्रतिभा सिंह (Pratibha Singh) यांनी मीडियाशी बोलताना भाजपचे काम काँग्रेसपेक्षा चांगले असल्याचे विधान करत खळबळ उडवून दिली आहे. काँग्रेसमध्ये अजून बऱ्याच गोष्टी व्हायच्या आहेत. खासदार म्हणून मी माझ्या मतदारसंघात नेहमी जाते, लोकांच्या भेटीगाठी घेते. पण भाजपचे काम काँग्रेसपेक्षा चांगले असल्याचे मान्य करावेच लागेल, असे त्या म्हणाल्या.

राज्यात सरकार आल्यानंतर पहिल्या दिवसापासून मी मुख्यमंत्र्यांना पक्षसंघटना बळकट करण्याबाबत सांगत आहे. त्याशिवाय निवडणुकीला सामोरे जाऊ शकत नाही. सध्या आमच्यासाठी कठीण स्थिती आहे. आम्हाला अनेक अडचणी दिसत आहेत. पंतप्रधान मोदींच्या आदेशानुसार भाजप अनेक गोष्टी करत आहे. याबाबत मी मुख्यमंत्र्यांना सांगितले आहे. आम्हाला निवडणूक लढवून जिंकायची आहे, असे प्रतिभा सिंह यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीत कुणाला तिकीट द्याचे हा निर्णय हायकमांडने घ्यायचा आहे. त्यांच्या आदेशानुसार आम्ही काम करू. आपण भाजपच्या संपर्कात नाही. आम्ही आमचे काम करत आहोत. उद्या काय होणार हे आपल्यालाही माहिती नाही, असे सूचक विधान प्रतिभा सिंह यांनी केले.  

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT