Covid Testing Sarkarnama
देश

कोरोना चाचणी कुणाची करावी, कुणी करू नये? केंद्र सरकारचा मोठा निर्णय

केंद्र सरकारने केलेल्या नवीन बदलांमुळे कोरोना रुग्णांचा आकडा आटोक्यात येऊ शकतो.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : देशात कोरोना (Corona) बाधितांचा आकडा वेगाने वाढत असताना केंद्र सरकारने चाचणीच्या नियमांमध्ये महत्वाचा बदल केला आहे. कोरोना (Covid19) चाचणी कुणाची करावी, कुणी करावी याबाबत नव्याने नियमावली जारी करण्यात आली आहे. घरात एखादी व्यक्ती कोरोनाबाधित असल्यास आतापर्यंत प्रत्येकाची चाचणी करणे आवश्यक होते. पण आता त्यामध्ये बदल करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लक्षणे असलेल्या नागरिकांनी लवकरात लवकर चाचणी करणे, इतरांपासून विलग होणे आवश्यक आहे. लवकर चाचणी केल्याने त्यानुसार उपचार करणे शक्य होऊ शकते. तसेच ज्येष्ठ नागरिक व इतर आजार असलेल्या नागरिकांच्या आरोग्याच्यादृष्टीने लवकर चाचणी करणे महत्वाचे आहे. पण याबाबत आता केंद्र सरकारने काही बदल केले आहेत.

नव्या बदलानुसार, कोरोनाबाधित रुग्णाच्या थेट संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीची चाचणी करणे आता आवश्यक नाही. रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचे वय 60 वर्षांहून अधिक किंवा इतर आजार असल्यास असे नागरिक अति जोखमीच्या गटात येतात. त्यामुळे त्यांनी चाचणी करणे आवश्यक आहे. पण त्यापेक्षा कमी वय व इतर आजार नसल्यास तसेच कोणतीही लक्षणे नसलेल्या रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तीने चाचणी करणे आवश्यक नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

कोरोना चाचणी (Covid Testing) कुणाची करावी?

1. ताप, खोकला, घसा दुखी, श्वास घेण्यास त्रास, वास किंवा चव नसणे तसेच श्वसनाशी संबंधित इतर लक्षणे असणाऱ्यांनी चाचणी करावी.

2. कोरोनाबाधित रुग्णांच्या थेट संपर्कात आलेले ज्येष्ठ नागरिक किंवा इतर आजार असलेव्या व्यक्ती.

3. परदेशांतून आलेले प्रवासी.

कोरोना चाचणी कुणी करू नये?

1. कोणतीही लक्षणे नसलेल्या व्यक्ती

2. कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील अशा व्यक्ती ज्यांचे वय 60 वर्षांपेक्षा कमी किंवा इतर आजार नसल्यास.

3. गृह विलगीकरणाच्या नियमानुसार डिस्चार्ज मिळणार असलेल्या व्यक्ती.

4. नव्या नियमावलीनुसार डिस्चार्ज मिळालेल्या व्यक्ती.

5. आंतरराज्य प्रवास केलेल्या व्यक्ती.

गृह विलगीकरणा सात दिवसांचे

गृह विलगीकरण (Home Isolation) किंवा रुग्णालयात असलेल्या रुग्णांसाठी सरकारने ही सुधारित नियमावली केली आहे. त्यानुसार लक्षणेविरहित किंवा सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना कोविड केअर सेंटर किंवा गृह विलगीकरणात ठेवण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यापासूनच्या सात दिवसांनी या रुग्णांना डिस्चार्च दिला जाईल. तसेच या रुग्णांना सलग तीन दिवस ताप नसावा. डिस्चार्ज घेताना कोरोना चाचणीची गरज नसल्याचेही स्पष्ट करण्यात आलं आहे.

मध्यम स्वरुपाची लक्षणे असलेल्या रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये (Covid Care Centre) दाखल करावे, अशा स्पष्ट सुचना आहेत. या रुग्णांची लक्षणे दिवसागणिक कमी होत गेल्यानंतर तसेच त्यांची नैसर्गिक ऑक्सीजन (Oxygen) पातळी सलग तीन दिवस 93 टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्यानुसार घरी सोडण्यात यावे. या रुग्णांनाही चाचणी करण्याची गरज नाही. ऑक्सीजनची गरज भासणाऱ्या रुग्णांनाही वैद्यकीय सल्लानुसारच घरी सोडले जाईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT