Cyber attacks on India Sarkarnama
देश

Cyber attacks on India : सीमेपलीकडून भारतावरील सायबर हल्ले तीव्र; उल्हासनगर महापालिकेच्या संकेतस्थळावर आक्षेपार्ह मजकूर झळकला

Cyber Attacks on India Surge After Indian Army Operation Sindoor Against Pakistan Based Terrorists : पाकिस्तानस्थित दहशतवाद्यांचे तळ ऑपरेशन सिंदूर’ नंतर उद्ध्वस्त केल्यानंतर सीमेपलीकडून भारतावरील सायबर हल्ले तीव्र करण्यात आल्याची माहिती मिळाली.

Pradeep Pendhare

Operation Sindoor : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्करानं पाकिस्तान स्थित दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यासाठी ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवलं. भारतीय लष्कराने दहशतवाद्याचं तब्बल नऊ तळ उद्ध्वस्त केली. यानंतर भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांत तणावाची स्थिती आहे. गेल्या तीन दिवसांपासून पाकिस्तानने 300 ते 400 ड्रोन हल्ल्यांसह गोळीबार, तोफगोळ्यांचा मारा केला. हे सर्व हल्ले भारतीय लष्करानं शिताफीनं निष्फळ ठरवले.

यातच आज सायंकाळी दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाली. परंतु पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन करत पु्न्हा हल्ले सुरू केले. भारत-पाकिस्तान देशामध्ये युद्धजन्य स्थिती असतानाच, सीमेपलीकडून भारतावरील सायबर हल्ले (Cyber Attacks) तीव्र झाले आहे. या सायबर हल्ल्यांमध्ये सरकारी, खासगी आस्थापना, संवेदनशील प्रकल्पांसोबत सर्वसामान्य नागरिकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी माहिती राज्याच्या सायबर विभागाकडून देण्यात आली.

संस्थात्मक डिजिटल संसाधनांवरील हल्ल्यांसोबतच सीमेपलीकडील संघटित हॅकर टोळ्यांनी आता मालवेअर संक्रमित फाइलचा प्रसार सुरू केला आहे. या फाइल एखाद्या सरकारी दस्तऐवजाच्या रूपात समाजमाध्यमे (Social Media) आणि ई-मेलद्वारे नागरिकांच्या मोबाईलवर येऊन धडकत आहेत. त्या उघडताच अपायकारक हालचाली सुरू होऊन डेटा चोरी किंवा विस्तृत नेटवर्क समूहाला अपाय संभवतो.

अज्ञात स्रोतांकडून आलेल्या लिंक, संलग्न फाइल उघडण्यापूर्वी ती पाठविणाऱ्या व्यक्ती, समूहाची ओळख तपासावी. अद्ययावत अँटीव्हायरस सॉफ्टवेअरचा वापर, नियमित प्रणाली तपासणी, सुरक्षित लॉगिनपद्धती आणि द्वि-स्तरीय प्रमाणिकरणाचे तंतोतंत पालन करणे आवश्यक आहे, अशी सूचना सायबर विभागाने जारी केल्या आहेत.

दरम्यान, उल्हासनगर महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर काल शनिवारी दुपारी ‘अल्लाहू अकबर, यू हेव्ह बिन हॅक’, असा आक्षेपार्ह मजकूर झळकला आणि काही काळासाठी प्रशासनासह नागरिकांमध्ये खळबळ उडाल्याचा प्रकार घडला. या प्रकरणात पाकिस्तानी हॅकर्सचा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र पालिकेच्या आयटी टीमने तत्काळ प्रतिक्रिया देत हा सायबर हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

आयुक्तांच्या आदेशानंतर महापालिकेची अंभियत्यांनी हे संकेतस्थळ ऑफलाइन केले. प्राथमिक माहितीनुसार, हॅकिंगचा हा प्रयत्न परकीय सायबर गुन्हेगारी गटांकडून (विशेषतः पाकिस्तानी हॅकर्स) झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. जनसंपर्क अधिकारी अजय साबळे यांनी सांगितले की, ‘महापालिकेचे संकेतस्थळ हॅक करण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यामुळे हे संकेतस्थळ तात्पुरते बंद करण्यात आले असून, तांत्रिक विश्‍लेषण चालू आहे. यासंदर्भातील अधिकृत माहिती लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल.’

महापालिकेच्या आयुक्त मनीषा आव्हाळे यांनी उल्हासनगर महापालिकेच्या वेबसाईटवर झालेल्या सायबर हल्ल्याचा प्रकार गंभीर असून, आमच्या आयटी विभागाने तत्काळ कृती करत तो प्रयत्न निष्फळ केला आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व अधिकृत माहितीची वाट पाहावी. सायबर सुरक्षेबाबत महापालिका पूर्ण सज्ज आहे, असे सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT