Indian Economy Growth : देशाच्या आर्थिक विकासाबद्दल बोलताना स्पेशल मिशन, आश्वासने, चर्चा यापेक्षा आकडे काय सांगतात, याला जास्त महत्त्व असते. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत म्हणजे एप्रिल ते जून 2026 या दरम्यान विकासदराला ब्रेक लागल्याचे दिसून येत आहे.
देशाचा जीडीपी वाढीचा दर 7.1 टक्के राहण्याचा अंदाज अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. अधिकृत आकडा महिना अखेरीस 31 ऑगस्टला केंद्र सरकारच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाकडून जाहीर केला जाईल. मात्र रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या सर्वेक्षणानुसार मागील तिमाहीच्या तुलनेत हा विकासदर कमी असण्याची शक्यता आहे.
ग्राहकांनी वस्तू-सेवांवर खर्च करण्यामुळे अर्थव्यवस्थेला आधार मिळाल्याचे दिसते. वस्तू व सेवा करातील (GST) कपात आणि काही करसवलतींमुळे नागरिकांच्या हातात काही प्रमाणात पैसा राहिला. त्यामुळे बाजारातील मागणी टिकून राहण्यासाठी त्याची मदत झाली. जीएसटी कपातीमुळे महागाईचा प्रभाव काही प्रमाणात कमी झाला. या काही सकारात्मक बाबींमुळे विकासदर सावरल्याचे चित्र निर्माण झाले असले तरी खासगी गुंतवणुकीचा वेग अपेक्षेप्रमाणे वाढलेला नाही, ही चिंतेची बाब असल्याचे अर्थतज्ज्ञांचे म्हणणे आहे.
महाग तेल आणि जागतिक परिस्थितीचा धोका अशी मोठी आव्हाने भारताच्या अर्थव्यवस्थेसमोर (Economy) आहेत. आशियातील तिसऱ्या क्रमांकाच्या मोठ्या अर्थव्यवस्थेसाठी मध्यपूर्वेतील संघर्ष आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती चिंतेचा विषय आहेत.
विशेषतः कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 90 डॉलरच्या पुढे गेल्यास भारताच्या अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम होऊ शकतो. याशिवाय अमेरिका-इराण युद्धाची अनिश्चितता आणि उत्पादन खर्चात होणारी वाढ यामुळे कंपन्यांच्या नव्या गुंतवणुकीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
रॉयटर्सने 17 ते 24 ऑगस्टदरम्यान 58 अर्थतज्ज्ञांचे सर्वेक्षण केले. त्यानुसार, एप्रिल-जून तिमाहीत भारताचा जीडीपी वाढीचा दर सुमारे 7.1 टक्के राहण्याचा अंदाज आहे. तर याआधीच्या तिमाहीत भारताचा जीडीपी वाढीचा दर 7.8 टक्के नोंदवण्यात आला होता. त्यानुसार आता झालेली घसरण पाहता आगामी आकडेवारीत विकासदर काहीसा कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
31 ऑगस्टला जाहीर होणाऱ्या अधिकृत आकडेवारीकडे आता अर्थतज्ज्ञ आणि बाजाराचे लक्ष लागले आहे. या आकडेवारीत जीडीपी वाढीचा दर किमान 6.2 टक्के ते जास्तीत जास्त 8 टक्क्यांदरम्यान राहू शकतो, असा अंदाज अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.