भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. गेल्या 40 वर्षांपासून वापरात असलेल्या जुन्या पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टीममध्ये (PRS) मोठे बदल करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून देशातील 2200 हून अधिक ट्रेन नव्या आणि अपग्रेडेड PRS सिस्टीमवर स्थलांतरित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे रेल्वे तिकीट बुकिंग, सीट उपलब्धतेची माहिती आणि आरक्षणाशी संबंधित प्रक्रिया अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे.
रेल्वे मंत्रालयाने ऑगस्ट 2026 पासून जुन्या आरक्षण प्रणालीतून नव्या प्रणालीकडे ट्रेन स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू केली होती. माहितीनुसार, 30 ऑक्टोबर 2026 पर्यंत 2200 पेक्षा अधिक ट्रेन नव्या PRS प्रणालीवर आणण्यात आल्या आहेत. सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम्स (CRIS) कडून ही आधुनिक प्रणाली विकसित केली जात आहे.
पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टीम म्हणजेच PRS ही रेल्वेची संगणकीकृत आरक्षण व्यवस्था आहे. या माध्यमातून प्रवाशांना रेल्वे तिकीट बुक करणे, तिकीट रद्द करणे आणि आरक्षणात बदल करणे शक्य होते. याशिवाय सीट उपलब्धता, वेटिंग लिस्ट, RAC स्टेटस, आरक्षण चार्ट आणि प्रवाशांच्या चौकशीची माहितीही या प्रणालीद्वारे हाताळली जाते.
2200 हून अधिक ट्रेन नव्या PRS सिस्टीमवर आल्यामुळे आरक्षण व्यवस्थापन अधिक आधुनिक होण्यास मदत होणार आहे. विविध ट्रेनमधील सीट उपलब्धतेची माहिती मिळवणे अधिक सोपे होऊ शकते. तिकीट बुकिंग, कॅन्सलेशन आणि आरक्षण चार्ट तयार करण्याची प्रक्रियाही अधिक व्यवस्थित होण्याची अपेक्षा आहे. जुन्या तंत्रज्ञानाऐवजी आधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे आरक्षण सेवेची क्षमता आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल.
दरम्यान, भारतीय रेल्वेची PRS प्रणाली 1986 मध्ये सुरू झाली होती. त्यानंतर वेळोवेळी तिचे आधुनिकीकरण करण्यात आले. 2002 मध्ये ऑनलाइन रेल्वे तिकीट बुकिंग सेवा सुरू झाली. सध्या देशातील एकूण रेल्वे तिकीट मागणीपैकी सुमारे 89 टक्के तिकीट बुकिंग ऑनलाइन माध्यमातून केले जाते.
याशिवाय IRCTC कडूनही गर्दीच्या वेळेत वेबसाइटवरील तांत्रिक अडचणी कमी करण्यासाठी आणि ऑनलाइन तिकीट बुकिंगचा अनुभव सुधारण्यासाठी प्रणाली अपग्रेड करण्याचे काम सुरू असल्याची घोषणा करण्यात आली आहे.