Rahul Gandhi Sarkarnama
देश

Congress News: काँग्रेसचा 215 पदाधिकाऱ्यांना दणका! महारॅलीला दांडी मारणं भोवलं! उपस्थितीवर होती डिजिटल नजर

Indian Youth Congress Suspends 215 Office Bearers:दिल्लीतील इंडिया आघाडीच्या 'व्होट बचाओ, देश बचाओ' महारॅलीला अनुपस्थित राहिल्याने भारतीय युवक काँग्रेसने विविध राज्यांतील २१५ पदाधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे.

Mangesh Mahale

Congress Suspends 215 Leaders: पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वाचे आदेश डावलून महत्त्वाच्या राजकीय कार्यक्रमाला अनुपस्थित राहणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर भारतीय युवक काँग्रेसने मोठी शिस्तभंगाची कारवाई केली आहे. दिल्लीतील इंडिया आघाडीच्या महारॅलीला उपस्थित न राहिल्याने देशातील विविध राज्यांमधील तब्बल २१५ पदाधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईमुळे काँग्रेसच्या संघटनात्मक वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली आहे.

दिल्लीतील रामलीला मैदानावर १ नोव्हेंबर रोजी 'व्होट बचाओ, देश बचाओ' या नावाने इंडिया आघाडीची महारॅली आयोजित करण्यात आली होती. मतदार यादीतील कथित अनियमितता आणि विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेच्या विरोधात ही रॅली काढण्यात आली होती. या कार्यक्रमाला काँग्रेससह इंडिया आघाडीतील विविध पक्षांचे प्रमुख नेते उपस्थित होते. मात्र, युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाने उपस्थित राहण्याचे स्पष्ट निर्देश देऊनही अनेक पदाधिकारी या कार्यक्रमाला पोहोचले नाहीत.

त्यानंतर अनुपस्थित पदाधिकाऱ्यांची माहिती गोळा करून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. भारतीय युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाच्या आदेशानुसार ही निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे संबंधित संघटनांकडून सांगण्यात आले आहे.

मध्य प्रदेशातील सर्वाधिक ६० पदाधिकाऱ्यांवर कारवाई

या कारवाईमध्ये मध्य प्रदेशातील सर्वाधिक ६० पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. गुजरातमधील ४९, झारखंडमधील ३२, पश्चिम बंगालमधील २६, तेलंगणातील १४, हिमाचल प्रदेशातील १३, उत्तर प्रदेश मध्यवर्ती विभागातील ११ आणि हरियाणातील १० पदाधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

निलंबित झालेल्यांमध्ये युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष, सरचिटणीस, सचिव तसेच जिल्हाध्यक्ष स्तरावरील पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. ही कारवाई पुढील आदेश मिळेपर्यंत कायम राहणार असल्याचे वृत्त आहे.

उपस्थितीवर ठेवली जात होती डिजिटल नजर!

या महारॅलीसाठी युवक काँग्रेसने उपस्थितीची विशेष व्यवस्था केली होती. राष्ट्रीय, राज्य आणि जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांना कार्यक्रमात सहभागी होणे बंधनकारक करण्यात आले होते. त्यासाठी 'विथ आयवायसी' (With IYC) या अधिकृत ॲपवर नोंदणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.

इतकेच नव्हे, तर दिल्लीतील मिंटो रोडवरील संमेलनस्थळी बारकोड स्कॅनरही बसवण्यात आले होते. या माध्यमातून पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीची डिजिटल नोंद ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यानंतर जमा झालेल्या माहितीच्या आधारे अनुपस्थित पदाधिकाऱ्यांची यादी तयार करण्यात आल्याचे वृत्त आहे.

दरम्यान, या कारवाईनंतर इतर राज्यांतील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीचाही आढावा घेतला जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे युवक काँग्रेसमधील संघटनात्मक शिस्तीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT