

Akola News: राज्यात भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष महायुतीच्या माध्यमातून सत्तेत एकत्र असले, तरी स्थानिक पातळीवर मात्र त्यांच्यातील मतभेद वारंवार समोर येत आहेत. आता अकोला जिल्ह्यातील हिवरखेड नगरपरिषदेतूनही महायुतीमधील संघर्षाची नवी घटना समोर आली आहे.
भाजपच्या नगरसेवकांनी शिंदेसेनेच्या चार नगरसेवकांविरोधात आणलेला अपात्रतेचा ठराव विशेष सभेत बहुमताने मंजूर झाला आहे. त्यामुळे स्थानिक राजकारणात चर्चेला उधाण आले आहे.
हिवरखेड नगरपरिषदेत शिवसेना शिंदे गटाचे पाच नगरसेवक निवडून आले आहेत. त्यापैकी चार नगरसेवकांविरोधात भाजपच्या १२ नगरसेवकांनी अपात्रतेचा प्रस्ताव दाखल केला होता. या प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी नगरपालिकेची विशेष सभा बोलावण्यात आली होती. या सभेत झालेल्या मतदानात १५ नगरसेवकांनी ठरावाच्या बाजूने, तर पाच जणांनी विरोधात मतदान केले. अशा प्रकारे १५ विरुद्ध ५ मतांनी अपात्रतेचा ठराव मंजूर करण्यात आला.
भाजपने अपात्रतेचा प्रस्ताव दाखल केलेल्या नगरसेवकांमध्ये रवी घुंगड, ऋषिकेश पंचबुद्धे, रामेश्वर हागे आणि श्यामशील भोपळे यांचा समावेश आहे. या चारही नगरसेवकांना अपात्र करण्यासंदर्भात विशेष सभेत हात वर करून मतदान घेण्यात आले. त्यामध्ये ठरावाच्या बाजूने बहुमत मिळाल्याने पुढील राजकीय आणि प्रशासकीय प्रक्रियेकडे लक्ष लागले आहे.
विशेष म्हणजे, हिवरखेड नगरपरिषदेत शिवसेना शिंदे गटाचे एकूण पाच नगरसेवक आहेत. त्यापैकी चार जणांविरोधात भाजपच्या नगरसेवकांनी एकत्रितपणे भूमिका घेतल्याने दोन्ही पक्षांमधील स्थानिक मतभेद उघड झाले आहेत.
विधानपरिषद निवडणूक आणि जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून महायुतीतील घटक पक्षांमध्ये यापूर्वीच मतभेद निर्माण झाले आहेत. त्यात आता हिवरखेड नगरपरिषदेतील या घडामोडीची भर पडली आहे. राज्यात सत्तेत एकत्र असलेल्या भाजप आणि शिंदेसेनेचे स्थानिक पातळीवर मात्र एकमेकांविरोधात उभे ठाकल्याचे चित्र दिसत आहे.
विशेष सभेत अपात्रतेचा ठराव मंजूर झाला असला, तरी या चारही नगरसेवकांचे सदस्यत्व प्रत्यक्षात रद्द झाले आहे, असे अद्याप म्हणता येणार नाही. त्याबाबतची अंतिम अधिकृत प्रक्रिया आणि सक्षम प्राधिकरणाचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे भाजपच्या या भूमिकेनंतर शिंदेसेना काय पाऊल उचलणार आणि या प्रकरणाचा महायुतीच्या स्थानिक राजकारणावर काय परिणाम होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.