Cockroach Janata Party Instagram 
देश

Instagram: ‘इन्स्टाग्राम’ ठरलं आंदोलनाचं प्रभावी माध्यम! जंतर-मंतरपर्यंत पोहोचलेल्या प्रवासानं 'असा' घडवला इतिहास

सीजेपीच्या यशस्वी आंदोलनाममुलं ‘इन्स्टाग्राम’सारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म केवळ मनोरंजनापुरतं मर्यादित न राहता मोठ्या जनआंदोलनांचे प्रभावी माध्यम बनत असल्याचेही अधोरेखित झाले.

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : ‘कॉक्रोच जनता पार्टी’ने सोशल मीडियावर सुरू झालेली ही मोहीम हळूहळू देशभरातील तरुणांचा आवाज झाल्याचा दावा पक्षाने केला आहे. या संपूर्ण घडामोडींमुळे ‘इन्स्टाग्राम’सारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म केवळ मनोरंजनापुरते मर्यादित न राहता मोठ्या जनआंदोलनांचे प्रभावी माध्यम बनत असल्याचेही अधोरेखित झाले.

मे २०२६ मध्ये सर्वोच्च न्यायालयातील एका सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश न्या. सूर्य कांत यांनी केलेल्या एका टिप्पणीवरून सोशल मीडियावर वाद निर्माण झाला. याच टिप्पणीच्या निषेधार्थ त्यांनी ‘कॉक्रोच’ हा शब्द आंदोलनाचे प्रतीक म्हणून स्वीकारला. त्यानंतर १६ मे २०२६ रोजी अभिजित दीपके यांनी ‘कॉकरोच जनता पार्टी’ची स्थापना केली.

१७ मे रोजी @cockroachjantaparty या नावाने ‘इन्स्टाग्राम’ अकाउंट सुरू करण्यात आले. सुरुवातीला मीम्स, रील्स आणि उपरोधिक पोस्टच्या माध्यमातून बेरोजगारी, नीट-यूजी परीक्षेतील कथित गैरव्यवहार, शिक्षणव्यवस्था, महागाई आणि तरुणांच्या विविध प्रश्नांवर सातत्याने पोस्ट प्रसिद्ध झाल्या. अवघ्या काही दिवसांत या अकाउंटशी कोट्यवधी लोक जोडले गेले आणि ही मोहीम झपाट्याने व्हायरल झाली. मोठ्या संख्येने तरुणांनी पक्षाच्या संकेतस्थळावर सदस्यत्वही घेतले. पक्षाच्या म्हणण्यानुसार, ग्राफिक, पोस्टर्स, जाहीरनामा आणि सोशल मीडिया सामग्री तयार करण्यासाठी ‘चॅट जीपीटी’सह विविध कृत्रिम बुद्धिमत्ता साधनांचाही वापर करण्यात आला. अत्यल्प साधनसामग्रीत उभारलेली ही डिजिटल मोहीम लाखो तरुणांपर्यंत पोहोचली.

जून आणि जुलैमध्ये हे आंदोलन सोशल मीडियाच्या चौकटीबाहेर पडून दिल्लीतील जंतर-मंतरवर पोहोचले. ‘सीजेपी’ आणि विविध विद्यार्थी संघटनांनी तेथे सातत्याने आंदोलन केले. या काळात ‘चलो संसद’ मोर्चाही काढण्यात आला. ‘जंतरमंतर’वरील धरणे, निदर्शने आणि सोशल मीडियावरील मोहीम अशा दोन्ही पातळ्यांवर आंदोलन सुरू राहिले. हे आंदोलन पूर्णपणे स्वयंसेवकांच्या बळावर उभे असल्याचा दावा पक्षाने केला.

‘अकाउंट ब्लॉक’ झाल्याने चर्चा

जुलैमध्ये आंदोलनादरम्यान ‘सीजेपी’चे इन्स्टाग्राम अकाउंट काही काळासाठी उपलब्ध नव्हते. त्यानंतर अभिजित दीपके यांनी ‘एक्स’वरील पोस्टमध्ये ‘मेटा’ने पक्षाचे इन्स्टाग्राम अकाउंट हटवल्याचा दावा केला. मात्र, काही वेळाने ते अकाउंट पुन्हा सुरू करण्यात आले. या घटनेनंतर सोशल मीडियावर नव्याने चर्चा रंगली आणि सीजेपी पुन्हा ट्रेंडमध्ये आली.

मोदींचा व्हिडिओही चर्चेत

दिल्लीत सर्व घडामोडी सुरू असतानाच बुधवारी (ता. २२) रात्री ११.५२ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ प्रसिद्ध केला. नेहमीच्या संबोधनांपेक्षा हा व्हिडिओ वेगळा होता. तो मोबाइलच्या फ्रंट कॅमेऱ्याने ‘व्हर्टिकल’ स्वरूपात चित्रित करण्यात आला होता. या व्हिडिओची सुरुवात त्यांनी नेहमीच्या ‘मित्रांनो’ऐवजी ‘फ्रेंड्स’ या संबोधनाने केली. २४ तासांच्या आत पंतप्रधानांनी दुसराही ‘इन्स्टाग्राम’ व्हिडिओ प्रसिद्ध केला. पहिल्या व्हिडिओला मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल त्यांनी नागरिकांचे आभार मानले आणि भविष्यातही असेच प्रेम व पाठबळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

माध्यमाची नवी झलक

‘कॉक्रोच जनता पार्टी’ची सोशल मीडियावर सुरू झालेली मोहीम राष्ट्रीय चर्चेचा विषय कशी ठरू शकते, याचे उदाहरण मानले जात आहे. ‘इन्स्टाग्राम’वर सुरू झालेली ही मोहीम जंतरमंतरवरील आंदोलनापर्यंत पोहोचली आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर तिची चर्चा आणखी वाढली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT